citynewsMaharashtra Politics

औसा नगरपरिषद निवडणूक : छाननीत ५५ अर्ज बाद; अनेक दिग्गजांना धक्का, नव्या चेहऱ्यांना संधी

लातूर जिल्ह्यातील औसा नगरपरिषदेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी दाखल उमेदवारी अर्जांची छाननी प्रक्रिया मंगळवारी तहसील कार्यालयात पार पडली. निवडणूक निर्णय अधिकारी घनशाम आडसुळ आणि सहायक निवडणूक अधिकारी मंगेश शिंदे यांच्या उपस्थितीत ही प्रक्रिया पूर्ण करण्यात आली.

एकूण दाखल १५६ अर्जांपैकी तब्बल ५५ अर्ज अवैध ठरले आहेत. यामध्ये नगराध्यक्ष पदासाठी दाखल १५ अर्जांपैकी ४ अर्ज बाद, तर ११ अर्ज वैध ठरले. तसेच नगरसेवक पदासाठी दाखल १४६ अर्जांपैकी ५१ अर्ज अवैध, तर ९५ अर्ज वैध ठरले आहेत.

छाननीत अवैध ठरलेल्या अर्जांमध्ये महायुतीतील प्रमुख पक्षांच्या अनेक इच्छुकांना धक्का बसला आहे. काही ठिकाणी तर एका पदासाठी पक्षाच्या अधिकृत दोन नावांपैकी एकाचा अर्ज बाद झाल्याने स्थानिक लढतीच्या समीकरणांवर थेट परिणाम होणार आहे. सर्वाधिक अर्ज अवैध ठरलेल्यांमध्ये भारतीय जनता पक्षाच्या उमेदवारांचा समावेश असल्याचेही समोर आले आहे.

गत निवडणुकीत निवडून आलेल्या अनेक नगरसेवकांना यावेळी पक्षांनी संधी न देता नव्या चेहऱ्यांवर विश्वास दाखवला आहे, अशी माहिती मिळत आहे.

अवैध अर्जांची संख्या मोठी असल्याने आता लढतीत उभे राहणारे नगराध्यक्ष आणि नगरसेवक उमेदवार स्पष्ट झाले आहेत. उमेदवारी अर्ज मागे घेण्याची मुदत २१ नोव्हेंबरपर्यंत असून २ डिसेंबर रोजी मतदान होणार आहे. छाननी पूर्ण झाल्यानंतर आता औसामध्ये निवडणुकीच्या प्रचाराचा जंगी धुरळा उडणार आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button