अमरावती जिल्हा : भाजप आणि सहयोगी पक्षात तिकीट वितरणावरून नाराजी – घराणेशाही पुन्हा चर्चेत

गेल्या दशकात भारतीय राजकारणात ‘घराणेशाही’ हा भाजपने सातत्याने उचललेला प्रमुख निवडणूक मुद्दा राहिला. काँग्रेसविरोधातील प्रचाराची धार या विषयावर अनेक वर्षे केंद्रित होती. मात्र, आता याच मुद्द्यावरून भाजप स्वतःही अडचणीत सापडल्याची परिस्थिती महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये दिसून येत आहे.
अमरावती जिल्ह्यातील नगर परिषद आणि नगर पंचायत निवडणुकीत तिकीट वाटप करताना पक्षासाठी वर्षानुवर्षे काम केलेल्या कार्यकर्त्यांना मागे सारून विद्यमान आमदार, खासदार किंवा पक्षातील मोठ्या नेत्यांच्या नातेवाइकांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेण्यात आल्याने व्यापक नाराजी उसळली आहे. या नाराजीची झळ विशेषतः दर्यापूर, अंजनगाव सुर्जी आणि धामणगांव रेल्वे नगर परिषदांमध्ये तीव्रतेने जाणवत आहे.
तीन ठिकाणी ‘एकाच घरात दोन पदे’ मॉडेल
या तीन नगर परिषदांमध्ये स्थानीक आमदारांनी नगराध्यक्ष पदही आपल्या कुटुंबात ठेवण्याची रणनीती राबवल्याचे स्पष्ट दिसते —
- दर्यापूर – भाजपने अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे यांच्या पत्नी नलिनी भारसाकळे यांना उमेदवारी
- अंजनगाव सुर्जी – शिवसेना (उद्धव ठाकरे) आमदार गजानन लवटे यांच्या पुत्र यश लवटे मैदानात
- धामणगांव रेल्वे – आमदार प्रताप अडसड यांच्या भगिनी अर्चना रोठे अडसड यांना तिकीट
या उमेदवारींमुळे स्थानिक पातळीवर तेच चेहरे आणि तीच घराणी पक्षांवर पूर्ण नियंत्रण मिळवत असल्याची कार्यकर्त्यांची भावना निर्माण झाली आहे.
दर्यापूरमध्ये देवरानी–जेठानी आमनेसामने
दर्यापूरमध्ये परिस्थिती आणखी रोचक असून नगराध्यक्षपदाच्या लढतीत एकाच घरातील नलिनी भारसाकळे (भाजप) आणि मंदाकिनी भारसाकळे (काँग्रेस) समोरासमोर आहेत. त्यामुळे ही लढत पक्ष विरुद्ध पक्ष न राहता ‘परिवार विरुद्ध परिवार’ बनली आहे.
कार्यकर्त्यांची नाराजी वाढली
भाजप आणि सहयोगी पक्षातील अनेक निष्ठावान कार्यकर्ते उघडपणे न बोलता असंतोषात असल्याचे वातावरण आहे. काही ठिकाणी निवडणुकीच्या अगदी जवळ पक्षात दाखल झालेल्यांना तिकीट मिळाल्याने नाराजी आणखी वाढली आहे.
कार्यकर्त्यांमध्ये चर्चा आहे की—
“पक्षासाठी सतत मैदानात, पण निर्णयाच्या वेळी फक्त सतरंजी उचलण्याचे काम आमच्या वाट्याला?”
अंतिम निकाल ठरवणार समीकरण
३ डिसेंबरला मतमोजणी पार पडणार आहे. त्यानंतर हे स्पष्ट होणार की—
- आमदारांच्या ‘घरगुती उमेदवारी’ची खेळी यशस्वी ठरते, की
- कार्यकर्त्यांचा असंतोष निवडणुकीच्या निकालांवर परिणाम करतो.
अमरावती जिल्ह्यातील या निवडणुका त्यामुळे केवळ स्थानिक नसून राजकीय संदेश देणाऱ्या ठरण्याची शक्यता राजकीय वर्तुळात व्यक्त केली जात आहे.



