Amaravti GraminAmravatiamravatinewscitynews

अंजनगाव सुर्जी नगरपरिषद निवडणूक : शिवसेना उबाठा आणि काँग्रेस आमनेसामने, ‘वोट बँक’वर थेट लढत

अमरावती जिल्ह्यातील अंजनगाव सुर्जी नगरपरिषद निवडणुकीने आता स्थानिक पातळीपलीकडे जाऊन मोठी राजकीय रंगत घेतली आहे. उमेदवारी अर्ज दाखल करण्याच्या शेवटच्या दिवशी झालेल्या नाट्यमय घडामोडींमुळे शिवसेना उबाठा गट आणि काँग्रेस या दोन प्रमुख पक्षांमध्ये थेट ‘वोट बँक’वरून सत्तासंघर्ष पेटल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे. या निवडणुकीच्या निकालाकडे आता संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागले आहे.

शिवसेना उबाठा गटाच्या आमदार गजानन लवटे यांचे पुत्र यश लवटे यांनी नगराध्यक्ष पदासाठी अर्ज दाखल करून स्पर्धेला नवी दिशा दिली. त्यानंतर काँग्रेसने आयशा बानो रशिद खा यांना नगराध्यक्षपदाची उमेदवारी दिल्यानंतर राजकीय समीकरणेच बदलली.

काँग्रेसने ही उमेदवारी अंजनगाव सुर्जीतील सुमारे १८ हजार मतदार असलेल्या एक प्रमुख आणि निर्णायक समुदायाला लक्षात घेऊन दिल्याचे समजते. त्यामुळे नगराध्यक्षा निवडीत या समुदायाचा निर्णायक प्रभाव राहणार, असा अंदाज राजकीय वर्तुळात व्यक्त केला जात आहे.

तथापि काँग्रेसची ही रणनीती ओळखून शिवसेना उबाठा गटानेही प्रतिस्पर्धी डाव आखत आपल्या २८ पैकी तब्बल ८ नगरसेवक जागांवर याच समुदायातील उमेदवारांना तिकीट दिले आहे. काँग्रेसने केवळ नगराध्यक्ष पदावर लक्ष केंद्रित केले असताना शिवसेना उबाठाने थेट या समुदायाच्या मतक्षेत्रात मोठी घुसखोरी करत ‘वोट बँक’वर प्रहार केल्याचे मानले जात आहे.

सध्या पाहता, अंजनगाव सुर्जी नगरपरिषद निवडणुकीत या मोठ्या समुदायाचा कल कोणाकडे झुकतो, यावरच आगामी राजकीय निकाल अवलंबून असेल. अशा तऱ्हेने ही निवडणूक शिवसेना उबाठा गट आणि काँग्रेस यांच्यातील प्रतिष्ठेची लढत ठरली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button