Amaravti GraminAmravatiamravatinewsBadneracitynewsLatest NewsLocal NewsMaharashtra

अनैतिक प्रेमसंबंधातून पत्नीनेच पतीला संपविले !

१२ नोव्हेंबर २०२५ — बडनेरा पोलिस ठाण्याच्या हद्दीत, हनुमानगढी ते भानखेडा रोडवरील जंगल परिसरात एका अज्ञात व्यक्तीचा मृतदेह आढळला. मृताच्या डोक्यावर मोठ्या दगडाने वार करण्यात आला होता, आणि चेहरा ओळखू न येईल असा चेंदामेंदा केला होता. तपासाची दिशा मिळाली ती मृतदेहाजवळ आढळलेल्या पॅशन प्रो मोटरसायकलवरून. वाहनाच्या तपासातून समोर आलं — ही मोटरसायकल प्रमोद बकाराम भलावी, वय ४२ वर्ष, रा. कारला (ता. चांदूर रेल्वे), सध्या अंजनगावबारी येथे राहणारा याच्याच नावावर होती. प्रमोद काही दिवसांपासून बेपत्ता असल्याचं लक्षात आलं, आणि चौकशीसाठी त्याची पत्नी छाया भलावी हिला पोलिसांनी विचारणा केली. ती उडवाउडवीची उत्तरे देत असल्याने पोलिसांचा संशय अधिकच बळावला. गोपनीय माहिती आणि तांत्रिक तपासातून समोर आलं की, छाया हिचे विश्वांबर दिगांबर मांजरे (वय ३९, रा. विश्वी, जि. बुलढाणा) या इसमासोबत अनैतिक संबंध होते.

गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या पथकाने तातडीने कारवाई करून, १३ नोव्हेंबरच्या पहाटे ४ वाजता विश्वांबरला अटक केली. चौकशीत त्याने या कटाची कबुली दिली — १० नोव्हेंबरच्या रात्री, पती प्रमोद याला “लघवीचा बहाणा” करून जंगलात नेण्यात आलं. तिथे कोयत्याने वार करून त्याला संपविले, आणि पुरावे नष्ट करण्यासाठी दगड घालून चेहरा विद्रूप केला.

घटनास्थळी लपवलेला कोयता जप्त करण्यात आला आहे. घटनेत वापरलेली दुसरी मोटरसायकल हिरो एमएच-२८-एनबी-१३९९ शोधून हस्तगत करण्याचे काम सुरू आहे. छाया भलावी हिला देखील पोलिसांनी चौकशीदरम्यान अटक केली असून, दोन्ही आरोपींवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. गुन्हे शाखेने केवळ ८ तासांत अज्ञात मृतदेहाचा शोध लावून अत्यंत कौशल्याने प्रकरण उघडकीस आणले आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button