आठ वर्षांपासून गायब नगरसेवकांना नागरिकांची बॅनरद्वारे फटकार

नांदेड शहरातील प्रभाग क्रमांक सहा गणेश नगरच्या मुख्य चौकात नागरिकांनी लावलेल्या एका बॅनरने सध्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडवली आहे.
या बॅनरवर स्पष्टपणे लिहिले आहे की – आठ वर्षांपासून गायब असलेल्या नगरसेवकांनी इच्छुक उमेदवार म्हणून आमच्या प्रभागात फिरू नये.
कुठल्याही पक्षाची उमेदवारी घेतल्यास आम्ही मतदान करणार नाही.” या बॅनरखाली नागरिकांनी पुढे लिहिले आहे राजकीय पक्षांना विनंती आहे, अशा निष्क्रीय नगरसेवकांना उमेदवारी देऊ नका. उमेदवारी दिल्यास त्याचे परिणाम भोगावे लागतील.” या संदेशामुळे सध्या नांदेड शहरात चर्चा रंगली आहे की, हा नागरिकांचा लोकशाहीतील जागरूकतेचा संदेश आहे का, की निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर उमेदवारांना दिलेला थेट इशारा?
गेल्या आठ वर्षांत आपल्या भागात कामकाज, समस्या निराकरण, किंवा विकासकामांमध्ये सहभाग न दाखविणाऱ्या काही नगरसेवकांविरोधात नागरिकांचा आक्रोश या बॅनरमधून व्यक्त झाल्याचे दिसते. निवडणुकीच्या तोंडावर नागरिकांचा हा रोष अनेक इच्छुकांसाठी धडा ठरण्याची शक्यता आहे.



