amravatinewsLatest NewsMaharashtra

अमरावतीचे सुपुत्र डॉ. मनीष शंकरराव शोभा गवई यांना इंडो-थाय आंतरराष्ट्रीय युथ अवॉर्डने सन्मानितदुसऱ्यांदा आंतरराष्ट्रीय स्तरावर इंडो-थाय युवा सांस्कृतिक महोत्सवाचे नेतृत्व

अमरावती प्रतिनिधी – सांस्कृतिक वैभवाने नटलेल्या अमरावती जिल्ह्यातील सुपुत्र डॉ. मनीष शंकरराव शोभा गवई यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर पुन्हा एकदा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे. थायलंड येथे १ ते ७ नोव्हेंबर २०२५ दरम्यान आयोजित इंडो-थाय आंतरराष्ट्रीय युवा सांस्कृतिक महोत्सवात डॉ. गवई यांना इंडो-थाय आंतरराष्ट्रीय युथ अवॉर्ड या प्रतिष्ठित सन्मानाने गौरविण्यात आले. विशेष म्हणजे, या महोत्सवाचे दुसऱ्यांदा नेतृत्व करण्याची संधीदेखील त्यांना प्राप्त झाली.

डॉ. गवई हे भारत सरकारच्या क्रीडा व युवक कल्याण विभागाचे राष्ट्रीय युवा पुरस्कारार्थी, अंतरराष्ट्रीय सार्क संघटनेचे युवा दूत, संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठाचे माजी राज्यपाल-नामित सिनेट सदस्य तसेच महाराष्ट्र शासनाचे विशेष कार्यकारी अधिकारी आणि राज्य युवा धोरणाचे विशेष निमंत्रित सदस्य आहेत. युवक कल्याण क्षेत्रातील त्यांच्या उल्लेखनीय कार्याची दखल घेऊन त्यांना हा सन्मान प्रदान करण्यात आला.

युवक सशक्तीकरण आणि जनजागृतीसाठी डॉ. गवई गेल्या दोन दशकांहून अधिक काळ सातत्याने कार्यरत आहेत. त्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर राष्ट्रप्रेम, सर्वधर्मसमभाव आणि विश्वशांती यासाठी विविध युवा उपक्रम राबवले आहेत. चीन, नेपाळ, थायलंड, भूटान, रशिया, दुबई आणि सार्क देशांमध्ये त्यांनी युवा राष्ट्रनिर्मिती आणि विकासातील सहभाग’ या विषयावर प्रभावी मांडणी केली आहे. तसेच त्यांनी अनेक सामाजिक व प्रबोधनपर कार्यक्रमांद्वारे युवकांना प्रेरित केले आहे.

थायलंडमधील स्वामी विवेकानंद सांस्कृतिक केंद्रात आयोजित युवा आदान-प्रदान कार्यक्रमात त्यांनी उपस्थित युवकांशी संवाद साधत आंतरराष्ट्रीय युवा शक्तीकरणाविषयी विचार मांडले. या महोत्सवात अमरावतीतील कलावंतांनाही आपली कला सादर करण्याची संधी मिळाली. टिम झेनिथ इंटरनॅशनलच्या वतीने अमरावतीतील कलाकारांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय सांस्कृतिक मंच मिळवून देण्यात आले. या टिमचे नेतृत्व श्री. मिथील कळंबे यांनी केले. तसेच सौ. प्रिती जाधव, श्री. कमलाकर मरघडे, कु. सायली वर्धे, डॉ. चंदा भाकरे, कु. अंजली पाटील, कु. समीक्षा वऱ्हाडे, पल्लवी वर्धे, अनिता वर्धे, कृती मुखिया, डॉ. सविता पोटदुखे आणि सम्राट सिंघाई यांचा सुद्धा सन्मान करण्यात आला.

हा आंतरराष्ट्रीय सन्मान महाराजा पंगेरन ड्यूक प्रिन्स राडेन मास नगाबेई जनरल दातुक डॉ. मुहम्मद जेसुनवाह चू बिन अब्दुल्ला रानोए आत्मोजो आणि बालीच्या राजकन्या यांच्या हस्ते प्रदान करण्यात आला. तसेच श्री. पॉल नरुला (संस्थापक – पॉल नरुला अकादमी, थायलंड), श्री. पीटर सोंबूनचा (आरोईन कौन्सुलेट जनरल), आणि श्री. एस. सिन्हा रॉय (सदस्य, चेंबर ऑफ कॉमर्स, थायलंड) यांच्या उपस्थितीत हा सोहळा पार पडला.

डॉ. गवई यांना आतापर्यंत युवक कल्याण आणि सामाजिक क्षेत्रातील कार्यासाठी सहा आंतरराष्ट्रीय आणि एकवीस राष्ट्रीय पुरस्कार प्राप्त झाले आहेत. त्यात आंतरराष्ट्रीय यूथ लीडरशिप अवॉर्डचाही समावेश आहे. विशेष म्हणजे, हा सन्मान मिळवणारे ते सर्वात तरुण भारतीय आहेत.

आपला हा सन्मान डॉ. गवई यांनी आपल्या स्वर्गीय आई-वडिलांना – स्व. शंकरराव आणि स्व. शोभा गवई – अर्पण केला असून बाळकृष्ण वानखडे, ललिता वानखडे, पत्नी डॉ. अनिता गवई आणि पुत्र शौर्य व आर्य यांचे आभार मानले. त्यांच्या या आंतरराष्ट्रीय यशाबद्दल राज्याचे मुख्यमंत्री श्री. देवेंद्र फडणवीस, केंद्रीय सामाजिक न्याय मंत्री ना. रामदास आठवले आणि राज्याचे युवक कल्याण मंत्री श्री. माणिकराव कोकाटे यांनी अभिनंदन केले आहे.

अमरावतीच्या भूमीतील या युवा नेतृत्वामुळे जिल्ह्याचा गौरव पुन्हा एकदा जागतिक पातळीवर झळकला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button