अंमली पदार्थ विक्री करणारे ३ आरोपी तुरुंगात रवाना

दिनांक 5 नोव्हेंबर रोजी संध्याकाळी सहा वाजता अजनी पोलीस ठाण्यातील पोलिस हवालदार ओंकार बाराभाई यांना गुप्त माहिती मिळाली की, राहुल पाटील नावाचा युवक आपल्या घरात गांजा ठेवून व्यवसाय करत आहे. ही माहिती वरिष्ठ अधिकाऱ्यांना देऊन पोलीस उपनिरीक्षक परमेश्वर आगासे यांच्या मार्गदर्शनात तात्काळ छापा टाकण्यात आला. वसंत नगर, डगलस हॉस्टेल रोडवरील धरती गणवीर यांच्या घरात भाड्याने राहणाऱ्या राहुल पाटीलच्या घराची तपासणी करण्यात आली. तपासणीदरम्यान पोलिसांना 5 किलो 246 ग्रॅम गांजा असा 1 लाख 4 हजार 920 रुपयांचा अंमली पदार्थ आणि 10 हजार रुपयांचा मोबाईल मिळून आला. तपासादरम्यान राहुल पाटीलने हा गांजा आपल्या साथीदारांकडून महेश वांढरे आणि जय शिववंशी यांच्या कडून घेतल्याचे उघड केले. त्यानंतर पोलिसांनी तत्काळ दोघांनाही अटक केली. ही कारवाई वरिष्ठ पोलीस अधिकारी शिवाजीराव राठोड, रश्मिता राव आणि नरेंद्र हिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली वपोनि. नितीनचंद्र राजकुमार आणि त्यांच्या टीमने केली. कारवाईत पोलीस उपनिरीक्षक सिद्धांत मस्के, पोलीस हवालदार ओंकार बाराभाई, नरेश श्रावणकर, मनिष भलमे, दादाजी माडेमवार, प्रविण खवसे, रोशन वाडीभस्मे आणि हिमांशु पाटील यांचा समावेश होता. संपूर्ण कारवाई दरम्यान एनडीपीएस कायद्याचे सर्व नियम पाळण्यात आले असून, आरोपींवर कलम 8(क), 20(4), 20(2)(ब) अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सदर तपास अजनी पोलीस ठाण्याद्वारे सुरू आहे.



