तुटलेल्या विजेच्या तारांमुळे ४ गायींचा मृत्यू!

धामणगाव तालुक्यातील वाढोणा फाटा दत्तापूर शेतशिवारात शुक्रवारी दुपारी घडलेल्या या घटनेने शेतकरी वर्ग हादरला आहे. केने पाटील यांच्या शेतामध्ये चरायला गेलेल्या गायी अचानक तुटलेल्या विजेच्या जिवंत तारांच्या संपर्कात आल्या आणि जागीच मृत पडल्या. या घटनेत सौरव ठाकरे यांच्या दोन, हरिभाऊ कट्यारमल यांची एक आणि सौरभ राऊत यांची एक अशा चार जर्सी गायींचा मृत्यू झाला आहे. प्रत्येक गायीची किंमत ५० ते ७० हजार रुपयांच्या दरम्यान असल्याने शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. एमएसईबीकडून गेल्या काही दिवसांपासून विजेच्या तारांची दुरुस्ती न केल्यानेच हा अपघात घडल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात आला आहे. दुर्घटनेनंतर संतप्त शेतकऱ्यांनी घटनास्थळी एकत्र येऊन अधिकाऱ्यांना जबाबदार धरण्याची मागणी केली. शेतकरी वर्गाने त्वरित नुकसानभरपाई जाहीर करावी आणि दोषींवर कठोर कारवाई व्हावी, अशी मागणी केली आहे.
दरम्यान, या घटनेनंतर एमएसईबीचे अधिकारी घटनास्थळी दाखल झाले असून पुढील तपास सुरू आहे.



