‘आपले रक्षक – पोलीस’ या विषयावर अविस्मरणीय शैक्षणिक सहल

अमरावती– बिर्ला ओपन माईंड्स इंटरनॅशनल स्कूलच्या K1 आणि K2 वर्गातील विद्यार्थ्यांनी अमरावतीतील गाडगेनगर पोलिस स्टेशनला भेट दिली. या सहलीचा उद्देश होता — विद्यार्थ्यांना समाजातील आपल्या सुरक्षा रक्षकांबद्दल म्हणजेच पोलिस दलाबद्दल जवळून माहिती देणे. या भेटीदरम्यान पोलिस स्टेशनचे अधिकारी श्री. गोवर्धन सर यांनी लहानग्या विद्यार्थ्यांचे उत्साहपूर्ण स्वागत केले. त्यांनी विद्यार्थ्यांना पोलिस स्टेशनमधील विविध विभाग दाखवले आणि पोलिसांचे दैनंदिन कार्य कसे चालते हे समजावून सांगितले. गोवर्धन सरांनी विद्यार्थ्यांना सायरनचा आवाज ऐकवला, पिस्तूल आणि बंदुकीविषयी माहिती दिली, आणि त्या साधनांचा वापर कोणत्या परिस्थितीत आणि का आवश्यक असतो हे अतिशय सोप्या भाषेत समजावले. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्सुकतेने प्रश्न विचारले आणि गोवर्धन सरांनी सर्व प्रश्नांची संयमाने उत्तरे दिली. या भेटीतून विद्यार्थ्यांना पोलिस दलाची शिस्त, समर्पण आणि देशसेवा प्रत्यक्ष पाहायला मिळाली. सहलीच्या शेवटी सर्व विद्यार्थ्यांनी आनंदाने ‘पोलिस आपले मित्र आहेत’ हा संदेश घेतला आणि आपल्या छोट्या मनात एक मोठा आदर्श रुजवला.



