रावेरच्या भाग्यश्री महाजनची राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी निवड

रावेर तालुक्यातील वाघोड गावाची कन्या, आणि शिव स्पोर्ट क्लबची होतकरू खेळाडू भाग्यश्री प्रकाश महाजन हिने आपल्या उत्कृष्ट खेळ कौशल्याने राज्यस्तरीय कबड्डी स्पर्धेसाठी स्थान मिळवलं आहे. ती महाराष्ट्र विद्या मंदिर, वाघोडची विद्यार्थिनी असून, जळगाव जिल्हा कबड्डी संघाच्या वतीने ५ ते ९ नोव्हेंबर २०२५ दरम्यान पुणे येथील बोपखेल गावात होणाऱ्या ३६ व्या किशोर/किशोरी गट राज्य अजिंक्यपद आणि निवड चाचणी स्पर्धेत सहभागी होणार आहे.
शिव स्पोर्ट क्लबमध्ये नियमित सराव करणारी भाग्यश्री ही अत्यंत साधारण कुटुंबातील असून, शालेय जीवनातही तिचं शैक्षणिक आणि क्रीडा क्षेत्रातील प्रदर्शन उत्कृष्ट आहे. जिल्हा असोसिएशनच्या चाचणीत तिने आपल्या चपळाई, ताकद आणि रणनीतीचा अप्रतिम वापर करून निवडकर्त्यांना प्रभावित केलं. या यशाबद्दल भाग्यश्रीचे प्रशिक्षक मंगेश महाजन, क्लबचे पदाधिकारी आणि सर्व क्रीडा प्रेमींनी तिचं मनःपूर्वक अभिनंदन केलं आहे. मंगेश महाजन यांनी सांगितलं की, “भाग्यश्रीसारख्या तरुण खेळाडूंच्या मेहनतीमुळे जळगाव कबड्डीला नवं बळ मिळत आहे.” भाग्यश्रीच्या या यशाबद्दल गावकऱ्यांसह शाळा व क्लबकडून कौतुकाचा वर्षाव होत आहे.



