धारणीत पहिल्याच दिवशी शाळांमध्ये कुलूप – शिक्षक गायब

धारणी तालुक्यात आज जिल्हा परिषद शाळांमध्ये दिवाळी सुट्टीनंतरचा पहिला दिवस होता. विद्यार्थ्यांनी मोठ्या उत्साहाने शाळेत हजेरी लावली, पण काही शाळांमध्ये मुख्याध्यापक आणि शिक्षक मात्र अनुपस्थित होते. स्रोतांकडून मिळालेल्या माहितीनुसार, काही शाळांमध्ये शिक्षक दुपारच्या सुटीपर्यंतही पोहोचले नव्हते. धारणी तालुक्यातील कंत्राटी शिक्षकांनी जर वेळेवर शाळा उघडल्या नसत्या, तर काही शाळांचे कुलूप आजही बंद राहिले असते. काही गावांमध्ये मुख्याध्यापक बदली झाल्यानंतरही त्यांनी नवीन ठिकाणी रुजू होण्यास नकार दिला आहे. तर काही शिक्षक अशा शाळांमध्ये काम करत आहेत जिथे विद्यार्थ्यांना नीट शिकवण्याची जबाबदारीही ते पार पाडत नाहीत. हे सर्व प्रकार शिक्षणव्यवस्थेच्या मूलभूत तत्त्वांना धक्का देणारे आहेत. मेळघाटासारख्या संवेदनशील भागात अशा प्रकारची शिक्षणातील बेफिकिरी गंभीर आहे. हे प्रकरण शिक्षण खात्याच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी गांभीर्याने घेणं अत्यावश्यक आहे.



