खंडाळाच्या जय जगदंबा यात्रेला भाविकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

बुलढाणा जिल्ह्यातील मेहकर तालुक्यातील खंडाळा येथे दरवर्षी प्रमाणे यंदाही जय जगदंबा मातेची एकदिवसीय यात्रा दिनांक ५ नोव्हेंबर रोजी अत्यंत भक्तिभावाने पार पडली. पहाटेपासूनच गावात धार्मिक आणि उत्सवी वातावरण निर्माण झाले होते. नवसाला पावणाऱ्या जय जगदंबा मातेच्या दर्शनासाठी परिसरातील आणि दूरवरच्या गावांमधून हजारो भाविकांनी मोठ्या श्रद्धेने हजेरी लावली. भक्तांसाठी पिण्याचे पाणी, बसण्याची व्यवस्था, तसेच सुरक्षेची काटेकोर तयारी करण्यात आली होती. जय जगदंबा माता ही “नवसाला पावणारी देवी” म्हणून ओळखली जाते, आणि तिच्या दर्शनाने भाविकांचे मनोबल वाढते, अशी श्रद्धा आहे. यात्रेच्या पार्श्वभूमीवर सकाळी ११ ते सायंकाळी ५ या वेळेत जगदंबा माता संस्थान येथे मोफत आरोग्य तपासणी आणि रोगनिदान शिबीर आयोजित करण्यात आले. या शिबिराचे आयोजन आरोग्य कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापराव जाधव यांच्या संयुक्त विद्यमानाने आणि SBI फाउंडेशनच्या सहकार्याने करण्यात आले. शिबिरात बीपी, शुगर, रक्त तपासणी आदी सेवा मोफत देण्यात आल्या. याशिवाय संतोष अंभोरे मित्र मंडळ यांच्या पुढाकाराने छबिले हॉस्पिटल प्रसूतीगृह व बालरुग्णालयाच्या संयुक्त विद्यमाने आणखी एक आरोग्य शिबीर घेण्यात आले. दोन्ही शिबिरांना नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
यात्रेच्या दिवशी खंडाळा गाव जयघोषाने दुमदुमले होते. जय जय जगदंबा… जय जय जगदंबा… या जयघोषाने संपूर्ण परिसर भक्तीमय झाला.
ग्रामस्थ आणि युवक मंडळाच्या प्रयत्नांमुळे संपूर्ण कार्यक्रम शिस्तबद्ध, सुंदर आणि भक्तीपूर्ण वातावरणात पार पडला.



