आयटीआय कॉलेजजवळ विद्यार्थ्यांमध्ये किरकोळ कारणावरून राडा

अमरावती शहरातील आयटीआय कॉलेजजवळ गुरुवारी दुपारच्या सुमारास दोन विद्यार्थ्यांच्या गटांमध्ये किरकोळ कारणावरून वाद झाला.
हा वाद इतका चिघळला की त्यात कोयत्यासारख्या धारदार शस्त्राचा वापर करण्यात आला. हल्ल्यात अभिजीत तुकाराम रायबोले (वय 20, रा. परतवाडा) हा विद्यार्थी गंभीर जखमी झाला आहे. मानेवर कोयत्याने वार करण्याचा प्रयत्न झाला, परंतु तो थोडक्यात चुकला, असे प्राथमिक माहितीतून समजते.
जखमी विद्यार्थ्याला तात्काळ अमरावतीच्या सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले असून सध्या त्याच्यावर उपचार सुरू आहेत.
घटनेची माहिती मिळताच गाडगेनगर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली आणि या राड्याची चौकशी सुरू केली आहे.
दरम्यान, प्रसारमाध्यमांनी जखमी विद्यार्थ्याशी संवाद साधण्याचा प्रयत्न केला असता, त्याने काहीही बोलण्यास नकार दिला.
या घटनेमुळे आयटीआय परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी परिस्थितीवर नियंत्रण मिळवले आहे.



