नितीन राऊत यांची आशिष शेलार विरोधात पोलिसात तक्रार

भाजप नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी अलीकडेच घेतलेल्या पत्रकार परिषदेत विशिष्ट समुदायावर दुबार मतदारांचा आरोप करत केलेल्या वक्तव्यावरून वाद निर्माण झाला आहे. या वक्तव्याला काँग्रेसने आक्षेप घेत तीव्र प्रतिक्रिया दिली आहे. माजी मंत्री नितीन राऊत यांनी आशिष शेलार यांच्या विरोधात नागपूरच्या जरीपटका पोलीस ठाण्यात औपचारिक तक्रार दाखल केली आहे. तक्रार देतेवेळी काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने पोलिस ठाण्यात दाखल झाले होते. या तक्रारीत नितीन राऊत यांनी नमूद केलं आहे की, आशिष शेलार यांच्या वक्तव्यामुळे धार्मिक तेढ निर्माण होण्याची शक्यता आहे, त्यामुळे त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात यावा. नितीन राऊत यांनी पोलिसांना दिलेल्या तक्रारीसोबत आशिष शेलार यांच्या पत्रकार परिषदेचा रेकॉर्डिंग असलेला पेन ड्राइव्ह देखील सादर केला आहे. याचबरोबर नितीन राऊत यांनी काल निवडणूक आयोगाकडेही लेखी तक्रार दाखल केली आहे. या संपूर्ण घडामोडीमुळे राज्यातील राजकीय वातावरण आणखीनच तापले आहे.



