माजी सरपंचाने केला १९ वर्षीय तरुणीवर जबरदस्तीचा प्रयत्न

निलंगा तालुक्यातील केळगाव येथे १९ वर्षीय तरुणी घरी एकटी असताना ३१ ऑक्टोबर रोजी सायंकाळी साडेपाच ते सहाच्या दरम्यान गावातीलच दोन इसमांनी तिच्यावर अतिप्रसंगाचा प्रयत्न केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मोहसीन अल्लाउद्दीन पांढरे हा इसम घरात घुसून मुलीला विचारपूस करण्याच्या बहाण्याने तिच्याशी गैरवर्तन करू लागला. त्याने मुलीचा हात धरत तिला अपशब्द वापरत जबरदस्तीचा प्रयत्न केला. मात्र, मुलगी त्याच्या तावडीतून सुटून बाहेर पळताच, गावातीलच दुसरा इसम शकील इब्राहिम पांढरे हा थांबलेला होता. त्याने मुलीला थांबवत लाथाबुक्क्या आणि चापटाने मारहाण केली. तसेच, दोघांनीही अश्लील शिवीगाळ करत जीव मारण्याची धमकी दिली. मुलीच्या आरडाओरडीनंतर शेजारी मदतीसाठी धावले आणि दोघे आरोपी घटनास्थळावरून पसार झाले. यानंतर मुलीने धाडसाने निलंगा पोलिस स्टेशन गाठत संपूर्ण घटना सांगितली. तिच्या तक्रारीवरून पोलिसांनी मोहसीन अल्लाउद्दीन पांढरे आणि शकील इब्राहिम पांढरे या दोघांविरुद्ध भारतीय न्याय सहिता कलम 74, 75, 329, 296, 351, 115 अशा गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला आहे. विशेष म्हणजे आरोपींपैकी शकील पांढरे हा केळगावचा माजी सरपंच असल्याचे समोर आले आहे. लोकप्रतिनिधी पदावर राहून असे अमानुष कृत्य करणाऱ्या आरोपीविरोधात गावात तीव्र संताप व्यक्त केला जात आहे. या घटनेचा पुढील तपास पोलिस निरीक्षक सूर्यवंशी यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे



