मेळघाटमधलं तहानलेलं गाव! अमरावती जिल्ह्यातील मांडवा गावाची हकिकत

मेळघाटच्या हिरवाईत लपलेलं हे गाव मांडवा. निसर्ग संपन्न असला तरी इथं आजही पाण्यासाठी हाकारे द्यावे लागत आहेत. गावाजवळील विहिरीची मोटार मागील पंचवीस दिवसांपासून बंद आहे. मोटार जळाल्यामुळे गावातील पाणीपुरवठा पूर्णपणे ठप्प झालाय. दररोज लांब अंतर चालत विहिरीपर्यंत जाणं ही गावकऱ्यांची रोजचीच वेळ झाली आहे. पण एवढंच नव्हे – ती विहीरही आता दूषित झाली आहे. पाण्यातून दुर्गंधी येते, आणि त्यामुळे आजारांचं प्रमाण वाढतंय.
विहिरीच्या परिसरात अस्वच्छता आणि शौचालयाच्या अभावामुळे संपूर्ण भागात दुर्गंधी पसरली आहे. महिलांना आणि लहान मुलांना याचा सर्वाधिक त्रास सहन करावा लागतोय. गावकऱ्यांचा प्रश्न एकच – “नेमकं पिण्यासाठी पाणी आणावं कुठून?” पाण्याविना अडकलेलं हे आयुष्य प्रशासनाच्या लक्षात येईल का?
ग्रामस्थांनी प्रशासनाकडे तातडीने दखल घेऊन नवी मोटार बसवावी, अशी मागणी केली आहे. मेळघाटच्या या मांडवा गावाने दाखवलेलं वास्तव हे केवळ एक गावाचं नाही – तर विकासाच्या घोषणांमधल्या वास्तवाचं आरशातलं प्रतिबिंब आहे.



