‘एक पाव साखर तरी वाटा!’ युवा स्वाभिमानचा यशोमती ठाकूर यांना करारा टोला

अमरावती – बडनेरा मतदारसंघाचे आमदार रवी राणा दरवर्षीप्रमाणे यंदाही गरीब, शेतकरी आणि कष्टकरी जनतेमध्ये दिवाळीचा आनंद वाटण्यासाठी विशेष उपक्रम राबवत होते. ‘दिवाळी किराणा भेट’ या मोहिमेअंतर्गत शहरातील आणि ग्रामीण भागातील हजारो लोकांना किराणा वस्तूंचे वाटप करण्यात आले.याच उपक्रमाअंतर्गत रवी राणा यांनी अनेक राजकीय नेते, माजी आमदार, नगरसेवक, आणि जनप्रतिनिधींना सुद्धा ही भेट दिली. त्यामध्ये काँग्रेस नेत्या आणि माजी मंत्री यशोमती ठाकूर यांच्याही घरी ही भेट पोहोचली. मात्र, यानंतर परिस्थिती वेगळीच वळण घेत गेली. यशोमती ठाकूर यांनी या भेटवस्तूला ‘अपमानकारक’ ठरवत आमदार रवी राणा यांच्यावर कठोर शब्दांत प्रतिक्रिया दिली. त्यांच्या या वक्तव्यावर राजकीय वर्तुळात मोठी चर्चा सुरू झाली. त्याच पार्श्वभूमीवर मंगळवार, २८ ऑक्टोबर रोजी युवा स्वाभिमान पार्टीच्या वतीने पत्रकार परिषद आयोजित करण्यात आली. या पत्रकार परिषदेत पक्षाचे पदाधिकारी विनोद गुहे, मिलिंद कहाले, अवी काळे आणि इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यावेळी त्यांनी म्हटलं, रवी राणा गोरगरिबांच्या घरात किराणा वाटतात… यशोमती ताईंनी तरी एक पाव साखर वाटून दाखवावी! या वक्तव्यामुळे या प्रकरणाला आता अधिक राजकीय रंग चढला असून, राणा आणि ठाकूर यांच्या तणावाला नवं वळण मिळालं आहे.



