पालघर जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह पावसामुळे भातशेती नुकसानग्रस्त

खानिवडे : दिवाळीच्या सणादिवशी लक्ष्मी पूजनाच्या संध्याकाळी वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे पालघर जिल्ह्यातील भातशेती मोठ्या प्रमाणात नुकसानग्रस्त झाली आहे. पिवळ्या सोन्यासारखी बहरलेली भाताची शेती चिखलात झोपवली गेली. यंदा पाच महिन्यांहून अधिक काळ सतत झालेल्या पावसामुळे आधीच हलक्या पिकांचे नुकसान झाल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
वसई तालुक्यातील पूर्व आणि पश्चिम भागात खरिप हंगामातील भाताची लागवड करण्यात आली होती. काही हलकी पिके आधीच काढणीसाठी तयार होती, तर गरवार व निम गरवार भाताची कणसेही पिकलेली होती. मात्र, लक्ष्मी पूजनाच्या दिवशी आलेल्या वादळी वाऱ्यासह पावसामुळे कापणीसाठी तयार शेती झोपवली गेली. आधीच कापलेली पिके सुकविण्यासाठी शेतात ठेवली असता ती भिजल्याने मोठे नुकसान झाले.
अवकाळी पावसाचे सत्र सुरूच असल्याने उरलेले उत्पादनही वाया जाण्याची भीती शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे. वसई तालुक्यातील शेतकऱ्यांचे दीपावलीच्या काळातच मोठे नुकसान झाले असून, त्यांनी शासनाकडे नुकसान भरपाई आणि कर्जमाफीसाठी तातडीने उपाययोजना करण्याची मागणी केली आहे.



