Latest NewsMaharashtraMaharashtra Politics

महायुती सरकारचा निर्णय ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला स्थगिती

महायुती सरकारने ‘मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण’ योजनेच्या ई-केवायसी प्रक्रियेला तात्पुरती स्थगिती दिली आहे. या ई-केवायसी प्रक्रियेद्वारे लाभ घेणाऱ्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न अडीच लाख रुपयांपेक्षा जास्त आहे का, याचा शोध सुरू होता. या तपासणीत महिलेच्या वडिलांसह पतीच्या कमाईचीही खातरजमा केली जात होती. या तपासणीमुळे राज्यातील ७० लाखांहून अधिक महिलांना ‘अपात्र’ ठरवले जाण्याची भीती व्यक्त करण्यात येत होती, ज्यामुळे लाभार्थी महिलांमध्ये नाराजीचे वातावरण होते. मात्र, आता सरकारने ई-केवायसीच्या सक्तीला तूर्तास स्थगिती देण्याचा निर्णय घेतल्यामुळे या महिलांना मोठा दिलासा मिळाला आहे.

सूत्रांच्या माहितीनुसार, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका डोळ्यासमोर ठेवून सरकारने हा निर्णय घेतला आहे. निवडणुकीच्या काळात महिला वर्गाची नाराजी ओढवून घेणे योग्य नाही, या विचारातून सरकारने तूर्तास e-KYC ची सक्ती थांबवली आहे. या निर्णयामुळे योजनेच्या लाभार्थी महिलांना ऑक्टोबर महिन्याचा हप्ता मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. तसेच, आता पुढे आणखी काही महिने महिलांना हे अर्थसहाय्य मिळत राहील, असे सध्या म्हटले जात आहे. या योजनेअंतर्गत ऑगस्ट २०२५ पर्यंत १४ हप्त्यांचे वितरण पूर्ण झाले आहे, ज्यामुळे राज्यातील महिलांना मोठी आर्थिक मदत मिळाली आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button