दिवाळीच्या तोंडावर अमरावतीची वाहतूक व्यवस्था कोलमडली!

अमरावती – दिवाळीच्या सणाला आता खरी सुरुवात झाली आहे. संपूर्ण अमरावती शहर सध्या खरेदीच्या धामधुमीमुळे गजबजून गेलेलं आहे. मात्र, या उत्साहामध्ये अमरावतीकरांसाठी एक मोठी डोकेदुखी ठरत आहे, ती म्हणजे शहराचं विस्कळीत वाहतूक नियोजन!
नागरिक मोठ्या संख्येने बाजारपेठेत दाखल होत आहेत, आणि यामुळे शहरात प्रचंड वाहतूक कोंडी होताना दिसत आहे. आज सकाळी 12 ते 1 च्या दरम्यान, शहरातील मालवीय चौक परिसर पूर्णपणे ठप्प झाला होता. यावरूनच दिसून येतं की, संपूर्ण शहरात वाहतूक व्यवस्थेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करण्यात आले आहे.
दिवाळीच्या काळात शहरात मोठ्या नियोजनाची अपेक्षा होती, पण कुठल्याच प्रकारचे नियोजन दिसत नाहीये. याचा थेट फटका सामान्य जनतेला बसत आहे.
अमरावती वाहतूक पोलीस फक्त ‘चालान टार्गेट’ पूर्ण करण्यात व्यस्त आहेत, पण वाहतूक व्यवस्था मात्र शून्य आहे! काही गडबड झाली की लगेच बॅरिगेट्स लावून रस्ता बंद करण्याची सोपी पद्धत वापरली जाते.
मालवीय चौकातील परिस्थिती पहा: केवळ दोन कर्मचारी एका टर्निंगवर आहेत, तर मुख्य पेट्रोल पंप बाजूला कुणीच नाही! फक्त एका वळणावर ड्युटी आणि मुख्य चौकाकडे दुर्लक्ष केल्यामुळे परिस्थिती बिघडली.
या वाहतूक कोंडीला आणखी एक कारण आहे, ते म्हणजे रस्त्यावरील अतिक्रमण! त्यामुळे वाहनचालकांना दुहेरी त्रासाला सामोरे जावे लागत आहे.
एकंदरीत, अमरावती वाहतूक पोलिसांचे नियोजन सपशेल अपयशी ठरले आहे आणि शहराचे दिवाळी नियोजन प्रश्नांच्या घेऱ्यात आहे.”



