टेबळी गावातील शाळेत ‘एक पेड माँ के नाम’ उपक्रमाने विद्यार्थ्यांची हरित दीवाळी

धारणी – धारणी तालुक्यातील टेबळी गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये या वर्षीची दीवाळी काहीशी वेगळी आणि आनंददायी ठरली. दीवाळी सुट्टी लागायच्या आधीच शाळेतील विद्यार्थ्यांनी आपल्या मुख्याध्यापिका, शिक्षक आणि शिक्षिका यांच्या सोबत उत्साहात सण साजरा केला. शाळेत गोड जेवण, फटाके, शुभेच्छा आणि हास्याची बरसात — सर्वांनी मिळून एकत्रितपणे “एक कुटुंब” म्हणून हा सण साजरा केला. या निमित्ताने “एक पेड माँ के नाम” हा विशेष उपक्रमही राबविण्यात आला. प्रत्येक विद्यार्थ्याने आपल्या हाताने एक झाड लावले आणि त्या झाडावर आपले नाव लिहिले. त्यासोबतच त्या झाडाची काळजी घेण्याची व ती वाढविण्याची जबाबदारीही विद्यार्थ्यांनी आनंदाने स्वीकारली.
निसर्गप्रेम आणि पर्यावरणाची जाणीव मुलांच्या मनात रुजविण्याचा हा प्रयत्न सर्वांनी कौतुकाने पाहिला.
मुख्याध्यापिका आणि सर्व शिक्षकवर्गांनी विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देत त्यांना दीवाळीच्या आणि उज्ज्वल भविष्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या वेळी पालक, गावातील नागरिक आणि शाळा परिवारातील सर्वजण उपस्थित होते.
झाडांची आपुलकी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावरूनच दिसत होती — ही छोटीशी कृती मोठ्या बदलाची सुरुवात ठरू शकते.



