दिवाळीच्या तोंडावर मालाडमधील संजय नगरमध्ये भीषण आग; १८ गाळे जळून खाक

मालाड (पूर्व), मुंबई – दिवाळीच्या पार्श्वभूमीवर मालाडच्या संजय नगर परिसरात शनिवारी (दि. १८ ऑक्टोबर) दुपारी भीषण आग लागली. ही आग संजय नगर, पठाणवाडी आणि पिंप्रीपाडा परिसरात पसरली होती. आगीचे भीषण स्वरूप इतके होते की तब्बल १५ ते १८ गाळे जळून खाक झाले. या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही, मात्र गाळेधारकांचे आणि स्थानिक व्यावसायिकांचे मोठ्या प्रमाणावर आर्थिक नुकसान झाले आहे.
प्राथमिक माहितीनुसार, दुपारी सुमारे १२ वाजता संजय नगरमधील पंजाब डेअरी जवळील केमिकलच्या गाळ्याला आग लागली. आगीचे कारण अद्याप स्पष्ट झालेले नाही. अचानक पेट घेतलेल्या आगीने काही मिनिटांतच आसपासच्या गाळ्यांना आपल्या विळख्यात घेतले. स्थानिक नागरिकांनी तातडीने बचावासाठी घरातील गॅस सिलिंडर बाहेर काढून सुरक्षित स्थळी धाव घेतली.
या दरम्यान, अग्निशमन दलाला घटनास्थळी पोहोचण्यासाठी जवळपास एक तास लागल्याचे स्थानिकांनी सांगितले. त्यामुळे आग अधिक फैलावली आणि नियंत्रण मिळवणे कठीण झाले. अखेर अग्निशमन दलाचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश आले. मात्र, तोपर्यंत १८ गाळे पूर्णतः जळून खाक झाले होते.
या आगीत कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी अनेकांचे व्यवसाय उद्ध्वस्त झाले असून आर्थिक नुकसान प्रचंड आहे. “अग्निशमन दल वेळेवर पोहोचले असते, तर एवढे नुकसान टाळता आले असते,” असे स्थानिक रहिवासी तबरेज यांनी सांगितले. या घटनेनंतर परिसरात भीतीचे वातावरण पसरले असून, अनेक कर्मचाऱ्यांपुढे रोजगाराचे संकट उभे राहिले आहे.
आग कशामुळे लागली याचा तपास सुरू असून, प्रशासनाकडून याप्रकरणी पुढील कारवाईची प्रतीक्षा आहे.



