राज ठाकरे यांचा सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल : ‘लाव रे तो व्हिडीओ’ म्हणत उघड केली भाषणातील विसंगती

मुंबई, 19 ऑक्टोबर 2025:
गोरेगाव येथील नेस्को मैदानावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचा (मनसे) भव्य मेळावा पार पडला. या मेळाव्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी केंद्र सरकारपासून ते राज्यातील सत्ताधारी महायुती सरकारवर जोरदार टीका केली. प्रमुख मुद्दा होता बोगस मतदार याद्यांचा. राज ठाकरे यांनी स्पष्ट शब्दांत सांगितले की, “जोपर्यंत मतदार याद्या स्वच्छ होत नाहीत, तोपर्यंत निवडणुका घेऊ दिल्या जाणार नाहीत.”
आपल्या भाषणात राज ठाकरे यांनी म्हटले की, “महाराष्ट्रात सुमारे ९६ लाख खोटे मतदार नोंदवले गेले आहेत. गेल्या अनेक वर्षांपासून मतदार याद्यांमध्ये गोंधळ सुरू आहे. निवडणुकीसारखी प्रक्रिया जर पारदर्शक नसेल, तर लोकशाहीची शुद्धताच राहणार नाही.”
यावेळी त्यांनी “लाव रे तो व्हिडीओ” असे म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह राज्यातील विविध आमदारांचे जुने भाषणांचे व्हिडीओ सभेमध्ये दाखवले. या माध्यमातून त्यांनी दाखवून दिले की सत्तेवर येण्याआधी आणि आल्यावर नेतृत्त्वाचे वक्तव्य कसे बदलते. त्यांनी नरेंद्र मोदी मुख्यमंत्री असताना दिलेलं एक जुने भाषण दाखवले ज्यामध्ये मोदी निवडणूक आयोगाने सत्ताधाऱ्यांचे गुलाम होऊ नये असे म्हणत होते. यावर राज ठाकरे म्हणाले, “तेव्हा त्यांनी जे सांगितलं, आज आम्ही तेच सांगत आहोत.”
राज ठाकरे यांनी पुढे सांगितले की, “सत्ताधारी पक्षाचे आमदार खुलेआम सांगत आहेत की निवडणुकीसाठी त्यांनी २० हजार बाहेरचे मतदार आणले. हे खरे असल्यास, ही गोष्ट गंभीर आहे.” यावेळी त्यांनी पैठणचे आमदार विलास भुमेर यांच्या एका भाषणाचा व्हिडीओ दाखवला, ज्यामध्ये त्यांनी असे विधान केले होते. ठाकरे म्हणाले की, “ही लोकशाहीची विटंबना आहे आणि राज्यातील मतदारांचा अपमान आहे.”
तसेच, त्यांनी अजित पवार गटाचे आमदार सतीश चव्हाण, एकनाथ शिंदे गटाचे संजय गायकवाड आणि भाजप आमदार मंदा म्हात्रे यांचेही जुने व्हिडीओ सार्वजनिक केले. या सगळ्या व्हिडीओमधून त्यांनी मतदार याद्यांमधील गोंधळ व निवडणुकीतील संभाव्य अनियमिततेकडे लक्ष वेधले.
राज ठाकरे यांनी निवडणूक आयोगाला आवाहन केले की, तो कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता मतदार याद्यांचे पुनरावलोकन करावे आणि संपूर्ण प्रक्रिया पारदर्शक ठेवावी. तसेच, त्यांनी राज्यातील जनतेला सजग राहण्याचे आवाहनही केले.



