भाजप भटक्या-विमुक्त आघाडी आणि ओबीसी मोर्चा कार्यकारिणीची घोषणा

भारतीय जनता पार्टी अमरावती जिल्हा ग्रामीण यांच्यावतीने आयोजित भटक्या-विमुक्त आघाडी व ओबीसी मोर्चा कार्यकारिणी नियुक्ती मेळावा शनिवार १८ ऑक्टोबर रोजी राजापेठ येथील भाजप कार्यालयात पार पडला. या कार्यक्रमात जिल्ह्यातील विविध भागांतून आलेले कार्यकर्ते मोठ्या संख्येने सहभागी झाले. भाजप ग्रामीण जिल्हाध्यक्ष रविराज देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत आयोजित या कार्यक्रमात भटक्या-विमुक्त आघाडीचे जिल्हाध्यक्ष म्हणून गोपाल राठोड यांच्यासह अनेक नव्या पदाधिकाऱ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले. कार्यक्रमादरम्यान रविराज देशमुख यांनी मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री यांच्या नेतृत्वाखाली राज्यात सुरू असलेल्या योजनांचे स्वागत करत धन्यवाद व्यक्त केले. त्यांनी सांगितले की, भाजपाचे सरकार हे सर्व समाजघटकांच्या विकासासाठी कटिबद्ध आहे आणि भटक्या-विमुक्त समाजाच्या उन्नतीसाठी विशेष प्रयत्न सुरू आहेत. या मेळाव्यात ग्रामीण भागातील असंख्य कार्यकर्ते, महिला पदाधिकारी, तसेच तरुण स्वयंसेवक सहभागी झाले होते. भाजपाच्या घोषणाबाजीने संपूर्ण परिसर दुमदुमून गेला. कार्यक्रमाच्या शेवटी नव्या पदाधिकाऱ्यांनी पक्षाच्या धोरणांचा प्रसार आणि जनसंपर्क वाढवण्याचा निर्धार केला.



