Latest NewsMaharashtraNashik

नाशिक विभागात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांना 1,474 कोटींची भरपाई; १६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना दिलासा

नाशिक, 19 ऑक्टोबर 2025 :
सप्टेंबर महिन्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे नाशिक विभागात मोठ्या प्रमाणावर शेतीपिकांचे नुकसान झाले. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने दिवाळीच्या पहिल्याच दिवशी नुकसान भरपाईची घोषणा केली आहे. एकूण ११ लाख ५० हजार ३०१ हेक्टर शेती क्षेत्र बाधित झाले असून, सुमारे १६ लाखांहून अधिक शेतकऱ्यांना याचा फटका बसला आहे. या नुकसानीसाठी सरकारने एकूण 1,474 कोटी रुपयांची भरपाई जाहीर केली आहे.

राज्य सरकारने संपूर्ण महाराष्ट्रासाठी 3,258 कोटी 56 लाख 47 हजार रुपयांची मदत मंजूर केली असून, त्यामधून नाशिक विभागाला मोठा वाटा मिळाला आहे. विभागातील सर्वाधिक नुकसान अहिल्यानगर (माजी अहमदनगर) जिल्ह्यात झाल्याने त्या जिल्ह्यासाठी 846 कोटी 96 लाख रुपयांची मदत जाहीर झाली आहे. त्यापाठोपाठ नाशिक जिल्ह्याला 317 कोटी, जळगाव जिल्ह्याला 299 कोटी, धुळे जिल्ह्याला 10 कोटी तर नंदुरबार जिल्ह्याला सर्वात कमी 54 लाख रुपयांची मदत मिळाली आहे.

शासनाने भरपाईची घोषणा दिवाळीच्या पहिल्याच दिवशी केली असली तरी, शेतकऱ्यांच्या खात्यात ही रक्कम प्रत्यक्षात कधी जमा होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. अनेक शेतकरी संघटनांनी मदतीची रक्कम तात्काळ वितरित करण्याची मागणी केली आहे.

किसान सभेचे राज्याध्यक्ष राजू देसले यांनी सांगितले की, “शासनाने जाहीर केलेली मदत अत्यंत अपुरी असून, ती दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा होणे गरजेचे आहे. अन्यथा शेतकऱ्यांमध्ये असंतोष वाढण्याची शक्यता आहे.”

अतिवृष्टीमुळे अनेक जिल्ह्यांतील शेतकऱ्यांचे आर्थिक गणित कोलमडले आहे. शासनाने भरपाईची रक्कम त्वरीत त्यांच्या खात्यात जमा करून सणासुदीच्या काळात त्यांना दिलासा द्यावा, अशी मागणी सातत्याने होत आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button