Accident NewsLatest NewsMaharashtraNashik

कर्मभूमी एक्सप्रेसमधून तिघे खाली पडले; दोघांचा मृत्यू, एक जखमी

नाशिक – नाशिक रोडजवळ एक गंभीर रेल्वे अपघात घडला असून, कर्मभूमी एक्सप्रेस या गाडीतून तिघे युवक खाली पडल्याची दुर्दैवी घटना शनिवारी (१८ ऑक्टोबर) रात्री घडली. या अपघातात दोन युवकांचा जागीच मृत्यू झाला असून, एक युवक गंभीर जखमी झाला आहे. सध्या त्याच्यावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

मुंबई लोकमान्य टिळक टर्मिनसहून बिहारच्या रक्सौलकडे जाणारी कर्मभूमी एक्सप्रेस (गाडी क्रमांक 12546) नाशिक रोड स्थानकावर थांबून काही वेळात पुढे निघाली. त्यानंतर पवारवाडीजवळील साईनाथ नगर परिसरात मारुती मंदिराजवळ तिघे युवक गाडीमधून खाली पडले. याबाबतची माहिती ओढा रेल्वे स्थानकाचे स्टेशन प्रबंधक आकाश यांनी नाशिक रोड रेल्वे प्रशासनाला दिली.

माहिती मिळताच नाशिक रोड पोलीस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक जितेंद्र सपकाळे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस पथकाने घटनास्थळी धाव घेतली. भुसावळकडे जाणाऱ्या रेल्वे पटरीवरील किलोमीटर 190/1 ते 190/3 दरम्यान दोन युवक मृतावस्थेत, तर एक युवक गंभीर जखमी अवस्थेत आढळून आला. त्याला तत्काळ जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले.

दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर उत्तर भारताकडे जाणाऱ्या गाड्यांमध्ये मोठी गर्दी असून, दरवाजाजवळ उभे असताना तोल जाऊन हे युवक खाली पडल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. जखमी व मृत युवकांकडे कोणतीही ओळख पटवणारी कागदपत्रे आढळली नाहीत. हे युवक दिवाळी साठी गावी जात होते की निवडणुकीसाठी प्रवास करत होते, याचा तपास सुरू आहे.

घटनेची माहिती मिळताच स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. रेल्वे लोको पायलट के. एम. डेरे यांनीही घटनेची माहिती रेल्वे प्रशासनाला दिली. रेल्वे पोलीस आणि नाशिक रोड पोलीस घटनास्थळी दाखल झाले असून, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सपकाळे यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button