Latest NewsMaharashtraNandedUncategorized

चेनापुर तांड्यात दूषित पाण्यामुळे गावकऱ्यांना विषबाधा!

नांदेड – नांदेड जिल्ह्यातील अर्धापूर तालुक्यातील चेनापुर तांडा येथे दूषित पाणी पिल्याने गावात विषबाधेचा प्रकार समोर आला आहे. काल सकाळपासून काही नागरिकांना जुलाब व उलट्यांचा त्रास जाणवू लागला. सुरुवातीला काही मोजके लोक आजारी पडले, परंतु काही तासांतच तब्बल 70 ते 75 ग्रामस्थांना विषबाधेची लक्षणं दिसू लागली. स्थानिक ग्रामस्थांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामपंचायतीच्या विहिरीतील दूषित पाणी पिल्यामुळे हा प्रकार घडल्याचे स्पष्ट झाले आहे.

घटनेनंतर आरोग्य विभागाने तात्काळ प्रतिसाद देत जिल्हा परिषदेच्या शाळेत उपचार शिबिर सुरू केले. रात्रभर वैद्यकीय अधिकारी आणि आरोग्य कर्मचारी गावात उपस्थित राहून आजारी नागरिकांवर उपचार करत होते. आज सकाळपासून गावात सर्वेक्षण सुरू असून, पाच ते सहा टीमच्या साहाय्याने घराघरांत वैद्यकीय तपासणी व औषध वितरण सुरू आहे.

तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीकांत देसाई यांनी दिलेल्या माहितीनुसार, आतापर्यंत 31 पुरुष व 34 महिलांना प्राथमिक उपचार देण्यात आले असून, काही गर्भवती महिलांना खबरदारी म्हणून अर्धापूर येथील शासकीय रुग्णालयात हलवण्यात आले आहे. विहिरीच्या पाण्याचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले असून, रिपोर्ट आल्यानंतर विषबाधेचं नेमकं कारण स्पष्ट होणार आहे.

दरम्यान, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. संगीता देशमुख यांनी सांगितले की, सध्या सर्व रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. मात्र या घटनेमुळे चेनापुर तांड्यात भीतीचं वातावरण निर्माण झालं असून, गावातील दिवाळीच्या सणावर विरजण पडलं आहे. गावकऱ्यांनी आता स्वच्छ पाण्याचा पुरवठा आणि सुरक्षित आरोग्यसेवेची मागणी केली आहे. विषबाधेची घटना सध्या नियंत्रणात असली तरी दिवाळीचा उत्सव मात्र फिका पडला आहे.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button