साताऱ्यात जिजामाता महिला बँकेचा परवाना रद्द; ठेवीदारांमध्ये मोठी खळबळ, दिवाळीपूर्वी आर्थिक अडचणीची भीती

सातारा : दिवाळीच्या पार्श्वभूमीवर रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने (RBI) साताऱ्यातील जिजामाता महिला सहकारी बँकेचा बँकिंग परवाना रद्द केला आहे. या निर्णयामुळे ठेवीदारांमध्ये प्रचंड अस्वस्थता पसरली असून बँकेच्या मुख्य कार्यालयासमोर ठेवींच्या परतफेडीसाठी ठेवीदारांनी मोठी गर्दी केली आहे.
आर्थिक स्थिती ढासळल्यामुळे RBIचा निर्णय
RBIने आपल्या निर्णयामध्ये स्पष्ट केलं आहे की, बँकेकडे आवश्यक भांडवली तरतूद नाही, तसेच तिची आर्थिक स्थिती समाधानकारक नसल्याने हा परवाना रद्द करण्यात आला आहे. त्यामुळे बँक आता कोणत्याही स्वरूपातील ठेवी स्वीकारू शकत नाही किंवा परतफेड देखील करू शकत नाही.
यापूर्वीही परवाना रद्द झाला होता
ही पहिली वेळ नाही. 2016 मध्येही बँकेचा परवाना रद्द करण्यात आला होता, मात्र बँकेच्या अपीलनंतर 2019 मध्ये तो पुन्हा बहाल करण्यात आला. त्यावेळीही बँकेच्या आर्थिक स्थितीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले होते आणि फॉरेन्सिक ऑडिटचे आदेश दिले होते. मात्र बँकेने लेखापरीक्षकांना सहकार्य न केल्याने प्रक्रिया अपूर्ण राहिली.
ठेवीदारांसाठी काय सुविधा?
RBIच्या माहितीनुसार, DICGC (Deposit Insurance and Credit Guarantee Corporation) च्या माध्यमातून प्रत्येक ठेवीदारास जास्तीत जास्त ₹5 लाखांपर्यंतचे संरक्षण मिळणार आहे. सप्टेंबर 2024 अखेरपर्यंत 94.41% ठेवी DICGC अंतर्गत संरक्षित होत्या.
लिक्विडेटर नेमण्याचे आदेश
RBIने सहकार आयुक्तांना लिक्विडेशनची प्रक्रिया सुरू करण्यास सांगितले असून लवकरच एका लिक्विडेटरची नियुक्ती होण्याची शक्यता आहे.
ठेवीदारांची मागणी – दिवाळीपूर्वी काही तरी मिळावे
110 कोटी रुपयांच्या ठेवी असलेल्या या बँकेच्या ठेवीदारांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की, दिवाळीपूर्वी काही रक्कम परत मिळावी, जेणेकरून कुटुंबाचा सण साजरा करता येईल. अनेक ठेवीदारांचा आर्थिक गाभा या बँकेत अडकलेला असून आता त्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागणार आहे.



