आझाद मैदानात आरक्षण पेटलं! कुणबी समाजाचं राज्य सरकारविरोधात आंदोलन सुरू – काय आहेत नेमक्या मागण्या?

मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला असताना, आता ओबीसी व कुणबी समाजानंही आझाद मैदानावर जोरदार आंदोलनाची हाक दिली आहे. सरकारने मराठा समाजाच्या मागण्यांवर कारवाई करत काही निर्णय घेतले. मात्र, यामुळे ओबीसी आणि कुणबी समाजामध्ये नाराजीचं वातावरण निर्माण झालं आहे.
कुणबी समाज रस्त्यावर का?
कुणबी समाजाच्या म्हणण्यानुसार, मराठा समाजाला OBC कोट्यात आरक्षण देणं चुकीचं असून, यामुळे मूळ ओबीसी घटकांचं नुकसान होईल. याच मुद्द्यावरून आज मुंबईच्या आझाद मैदानावर हजारो कुणबी बांधवांनी सरकारविरोधात जोरदार निदर्शने सुरू केली आहेत.
या आंदोलनाचं आयोजन कुणबी समाजोन्नती संघाचे अध्यक्ष अनिल नवगणे आणि उपाध्यक्ष शंकरराव म्हसकर यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आलं आहे. आंदोलनात मुंबई, ठाणे, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर आणि उपनगरातील हजारो कार्यकर्ते सहभागी झाले आहेत.
कुणबी समाजाच्या महत्त्वाच्या मागण्या:
मराठा समाजाला दिलेलं OBC आरक्षण तात्काळ रद्द करावं.
न्यायमूर्ती शिंदे समितीला घटनाबाह्य ठरवून बरखास्त करावं.
OBC विद्यार्थ्यांना 100% शिष्यवृत्तीची अंमलबजावणी करावी.
जातिनिहाय जनगणना तातडीने करावी.
शामराव पेजे आर्थिक विकास महामंडळाला स्वतंत्र दर्जा व ₹150 कोटी निधी द्यावा.
लोकनेते शामराव पेजे न्यासासाठी ₹50 कोटी निधी द्यावा.
पेजे आणि म्हसकर समितीच्या प्रलंबित मागण्या पूर्ण कराव्यात.
कोकणातील कुणबी समाजाच्या खोत जमिनींच्या नोंदी करण्यात याव्यात.
जन्माने आणि कर्माने कुणबी असणाऱ्यांना जात प्रमाणपत्र सहज मिळावं.
हैदराबाद गॅझेटियरवरूनही वाद
मराठा समाजाला कुणबी म्हणून ओळख देण्याच्या हेतूने हैदराबाद गॅझेटियरचा वापर शासन निर्णयात करण्यात आला आहे. यावर अनेक संघटनांनी आक्षेप घेत मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्या. मात्र, न्यायालयाने या याचिकांना अंतरिम स्थगिती देण्यास नकार दिला, ज्यामुळे मराठा समाजाला दिलासा तर मिळाला, पण कुणबी समाजात असंतोष वाढला.
काय म्हणतो समाज?
“सरकारने एका समाजासाठी दुसऱ्या समाजाच्या अधिकारांवर गदा आणू नये. आम्ही कुणबी समाजाची ओळख व आरक्षण अबाधित राहावी यासाठी लढा देणारच,” असे संयोजकांनी स्पष्ट केलं.



