अजगराला निर्दयी मारहाण, वनविभागाने घेतला आरोपी ताब्यात

सावनेर : सावनेर तहसीलमधील मानेगाव येथील रहिवासी आणि वन्यजीव प्रेमींना धक्का देणारे प्रकरण समोर आले आहे. एक अजगर, जो परिसरातील जंगलात सुरक्षितपणे राहात होता, त्याला काही स्थानिकांनी निर्दयीपणे मारले. या घटनेचा धक्कादायक व्हिडिओ समोर आल्यानंतर, हित ज्योती फाउंडेशनचे अध्यक्ष हितेश दादा बनसोड यांनी या क्रुर कृत्य करणाऱ्यावर तात्काळ कारवाई करण्याची मागणी केली. व्हिडिओ व्हायरल होताच वनविभागाने ताबडतोब कारवाई करत आरोपीला काही तासांत ताब्यात घेतले. सध्या आरोपीविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू आहे आणि तपास अधिकारी पुढील चौकशी करत आहेत.
या घटनेने स्थानिक समाज तसेच पशुप्रेमींमध्ये रोष निर्माण केला आहे. “इतकी निर्घृणपणे एका मुक्या जनावराला मारणे कितपत योग्य आहे?” असा सवाल अनेकांनी केला आहे. वन्यजीव तज्ज्ञांच्या मते, अजगरसारख्या प्राणी निसर्गसंपत्तीचा महत्त्वाचा भाग आहेत आणि त्यांच्यावर हल्ला करणे गंभीर गुन्हा ठरतो.
स्थानिक प्रशासनाने घटनास्थळी पथक पाठवून अजगरांचे संवर्धन सुनिश्चित करण्यासाठी उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले आहे.



