मोरेबाग-मसानगंजमधील ट्रक, गेरेज आणि गोडाऊनमुळे नागरिक त्रस्त

मोरेबाग-मसानगंज भागातील अरुणा हॉस्टेल रोड हा परिसर मूळतः निवासी भाग असून येथे शाळा, दवाखाने, बालवाड्या आणि सार्वजनिक पाणीपुरवठा नळ आहेत. पण गेल्या काही वर्षांत या भागात अवैध गेरेज, वर्कशॉप आणि गोडाऊन उभे राहिले आहेत.
मोठ्या ट्रक आणि जड वाहनांमुळे हा रस्ता दररोज धोकादायक बनला आहे.
१) शाळांचा धोका:
या परिसरात बालवाडी, छत्रसाल प्राथमिक व माध्यमिक शाळा आहेत.
विद्यार्थ्यांना शाळेत ये-जा करताना ट्रकांच्या हालचालीमुळे जीव धोक्यात येतो.
काही वेळा ट्रक सुरु असतानाच दरवाज्याजवळून मुले जातात, ज्यामुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.
२) महिलांवरील त्रास:
महानगरपालिकेने पाणीपुरवठ्यासाठी परिसरात सार्वजनिक नळ बसवले आहेत.
परंतु या नळाजवळच ट्रक उभे असल्याने महिलांना आणि लहान मुलांना पाणी भरण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागतो.
ट्रक ड्रायव्हरकडून अश्लील हावभाव केल्याचे प्रकारही घडत आहेत, त्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण आहे.
३) दवाखान्याला जाण्यात अडथळे:
या भागातील रहिवाशांना दवाखान्यात जाण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो,
पण रस्त्यावर उभे असलेले ट्रक अपघाताची भीती निर्माण करतात.
४) बाजारात जाणं धोक्याचं:
विलासनगर, ऋषिनगर, शोषानगर आणि इतर वसाहतीतील नागरिक इतवारी बाजार आणि बसदेवी मंदिराकडे जाण्यासाठी हाच रस्ता वापरतात.
पण गेल्या काही दिवसांपासून दररोज १० ते १२ ट्रक रस्त्यावर उभे राहिल्यामुळे वाहतूक विस्कळीत झाली आहे.
या भागात कधीही मोठा अपघात होऊ शकतो, अशी नागरिकांची भीती आहे.
५) प्रशासनाचे दुर्लक्ष:
२८ फेब्रुवारी २००४ रोजी महानगरपालिकेच्या सभेत तसेच १६ फेब्रुवारी २००४ रोजीच्या स्थायी समितीत
गोडाऊन, गेरेज आणि वर्कशॉप शहरातील वर्दळीच्या रस्त्यांवर बंद ठेवण्याचा ठराव झाला होता.
मात्र त्या ठरावाची अंमलबजावणी आजतागायत झालेली नाही.
६) पूर्वीचे अपघात:
१२ सप्टेंबर २०१९ रोजी मसानगंज भागात २ वर्षीय बालक आदित्य साहू याचा मिनी ट्रकखाली चेंगरून मृत्यू झाला.
तसेच ५ डिसेंबर रोजी हनुमान मंदिरासमोर १० वर्षीय विद्यार्थी ट्रकखाली सायकलसह गेला आणि उपचारादरम्यान मृत्यूमुखी पडला.
या दोन अपघातांनंतरही प्रशासनाने धडा घेतला नाही, आणि आजही ट्रकांचा त्रास कायम आहे.
रहिवाशांची मागणी स्पष्ट आहे कि, “या रस्त्यावर अवैध गेरेज, गोडाऊन आणि ट्रक पार्किंग बंद करण्यात यावे,
आणि २००४ च्या ठरावाची तात्काळ अंमलबजावणी करण्यात यावी.”



