पुसदमध्ये मोकाट कुत्र्यांचा हैदोस, ग्रामीण रुग्णालयात रेबीज इंजेक्शनचा तुटवडा

पुसद उपजिल्हा ग्रामीण रुग्णालय हे शहरासह आसपासच्या 100 हून अधिक गावांतील नागरिकांसाठी मुख्य आरोग्य केंद्र मानले जाते.
मात्र गेल्या काही दिवसांपासून या रुग्णालयात रेबीज इंजेक्शनचा साठाच संपला आहे.
या परिस्थितीमुळे कुत्र्याच्या चाव्याने त्रस्त झालेल्या नागरिकांना खासगी औषध दुकानांतून इंजेक्शन खरेदी करावे लागत असून, त्यामुळे त्यांच्यावर मोठा आर्थिक भार पडतोय. बाजारात रेबीज इंजेक्शनचा दर अंदाजे 1000 रुपये असल्याचे सांगितले जाते. दैनिक मजुरी करणाऱ्या, शेतमजुर, आणि गरीब वर्गातील नागरिकांसाठी ही रक्कम परवडणारी नाही. यामुळे रेबीज संसर्गाचा धोका वाढला असून, सार्वजनिक आरोग्य विभागावर नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
दरम्यान, शहरातील मुख्य चौक, अंतर्गत रस्ते, आणि शाळा-महाविद्यालय परिसरात मोकाट कुत्र्यांचे कळप दिसून येत आहेत.
दररोज अनेक जण या कुत्र्यांच्या त्रासाला सामोरे जात असून, बालक आणि विद्यार्थ्यांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे.
स्थानिकांनी आरोग्य प्रशासनाकडे वारंवार तक्रारी केल्या असल्या तरी अद्याप कोणतीही कारवाई किंवा इंजेक्शन पुरवठा झालेला नाही.
रेबीज हा एक जीवघेणा आजार असून, उपचार वेळेत न झाल्यास मृत्यू ओढवू शकतो. त्यामुळे तातडीने इंजेक्शनचा पुरवठा सुरू करावा, अशी मागणी नागरिकांकडून होत आहे.



