Latest NewsMaharashtra

आरक्षणासाठी आत्महत्यांच्या लिहिलेल्या चिठ्ठ्या बनावट – लातूर पोलिस

लातूर : लातूर जिल्ह्यात गेल्या दोन महिन्यांतील तीन आत्महत्यांच्या घटनांनी समाजात मोठी खळबळ माजवली होती. मराठा, महादेव कोळी आणि बंजारा समाजातील व्यक्तींनी आत्महत्या केली असल्याची माहिती मिळाली होती, आणि त्यासोबत समाज आरक्षणाशी संबंधित चिठ्ठ्या सापडल्याने तणाव निर्माण झाला होता. पण पोलीस अधीक्षक अमोल तांबे यांनी पत्रकार परिषदेत दिलेल्या माहितीनुसार या तिन्ही प्रकरणांमध्ये चिठ्ठ्या मृत व्यक्तींनी लिहिलेल्याच नव्हत्या. त्या नंतर काही लोकांनी बनावट तयार करून पोलिसांकडे दिल्या होत्या. फॉरेन्सिक तपास, हॅन्डरायटिंग अॅनालिसिस आणि डिजिटल पुरावे तपासल्यानंतर या बनावट चिठ्ठ्यांचा पर्दाफाश झाला.

या तिन्ही प्रकरणांचा सविस्तर आढावा देताना पोलीस अधीक्षकांनी एक एक प्रकरणाची विस्तृत माहिती दिली,

 पहिले प्रकरण बळीराम श्रीपती मुले, वय ३५, शिंदगी, ता. अहमदपूर.
२६ ऑगस्टला त्यांनी विष प्राशन करून आत्महत्येचा प्रयत्न केला. त्यांच्या नातेवाइकांनी पोलिसांकडे एक चिठ्ठी दिली, ज्यात लिहिलं होतं – “मी मराठा आरक्षणासाठी आत्महत्या करतो.” पण फॉरेन्सिक तपासात हे लेखन मुले यांचे नसल्याचं स्पष्ट झालं.

 दुसरे प्रकरण – शिवाजी वाल्मिक मेळ्ले, वय ३०, दादगी, ता. निलंगा.
१३ सप्टेंबर रोजी करंट लागून त्यांचा मृत्यू झाला. घटनास्थळी कोणतीही चिठ्ठी सापडली नव्हती, मात्र नंतर शर्टच्या खिशातून मिळालेल्या पर्च्यात लिहिलं होतं – “महादेव कोळी समाजाला जात प्रमाणपत्र मिळत नाही.” पोलिसांनी ही पर्ची तपासली असता तीही बनावट असल्याचं समोर आलं.

 तिसरे प्रकरण – अनिल बळीराम राठोड, वय ३८, हणमंतवाडी तांडा, ता. चाकूर.
१४ सप्टेंबर रोजी घर बांधकामादरम्यान करंट लागून मृत्यू झाला. घटनास्थळी काहीही चिठ्ठी नव्हती. मात्र नंतर शिवाजी फत्तु जाधव नावाच्या व्यक्तीने पोलिसांना चिठ्ठी दिली, ज्यात लिहिलं होतं – “बंजारा समाजाला एसटी आरक्षण मिळावं म्हणून आत्महत्या करतो.” पण तीही मृत व्यक्तीच्या हस्ताक्षरात नसल्याचं निष्पन्न झालं.

या तिन्ही प्रकरणांत संबंधित पोलीस ठाणे अहमदपूर, निलंगा आणि चाकूर गुन्हे दाखल केले होते. तपासादरम्यान पोलीसांनी पुरावे गोळा केले आणि शेवटी या सर्व घटना एका आरक्षणाशी संबंधित फसवणुकीचा भाग असल्याचं उघड झालं. एसपी अमोल तांबे यांनी सांगितलं की, “महाराष्ट्रात पहिल्यांदाच अशा प्रकारे आरक्षणाशी संबंधित आत्महत्यांच्या बनावट चिठ्ठ्यांचा पर्दाफाश झाला आहे. त्यांनी सांगितलं की पोलीस फॉरेन्सिक व तांत्रिक तपासाच्या आधारे आणखी संबंधित लोकांवर कारवाई करतील.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button