अमरावती पोलिसांनी केली 34 जनावरांची सुटका

07 ऑक्टोबर 2025 रोजी नागपुरीगेट पोलिसांना गोपनीय माहिती मिळाली की, इरफाननगर, लालखडी परिसरातील एका टिनाच्या गोडाऊनमध्ये काही गौवंश जनावरे कत्तलीच्या उद्देशाने बांधून ठेवली आहेत. यानंतर वपोनि हनमंत उरलागोंडावार यांनी त्यांच्या पथकासह तात्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सदर ठिकाणी तपासणी केली असता, एकूण 34 जनावरे उपाशी, तहानलेली आणि वेदनादायक अवस्थेत बांधलेली आढळली.
ही जनावरे कत्तलीच्या तयारीत असल्याचे स्पष्ट दिसून आले. पोलिसांनी तात्काळ पंचासमक्ष जप्ती कारवाई केली आणि सर्व जनावरे सुरक्षितपणे गौरक्षण संस्था, दस्तुरनगर, अमरावती येथे दाखल करण्यात आली. या जनावरांची एकूण किंमत अंदाजे 5 लाख 40 हजार रुपये इतकी असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दरम्यान, या गोडाऊनचा व जप्त जनावरांचा मालक ओळख पटवून, त्याच्याविरुद्ध प्राण्यांना क्रूरतेने वागविण्यास प्रतिबंध करणारा अधिनियम 1960 च्या कलम 11 (1) (डी) व 11 (1) (ई) सहकलम 119 महाराष्ट्र पोलीस कायदा अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
ही कारवाई नागपुरीगेट पोलिस स्टेशनच्या कार्यकुशल टीमने केली असून, अमरावती शहर पोलिसांच्या संवेदनशीलतेचे आणखी एक उदाहरण यातून समोर आले आहे.



