समृद्धी महामार्गावर दाट धुक्यामुळे भीषण अपघात, ६ मजूर गंभीर जखमी

चंद्रपूर – चंद्रपूर जिल्ह्यातील नागभीड तालुक्यातील वल्ली गावातील 15 ते 16 मजूर मनबा कारंजा येथे सोयाबीन सोंगण्यासाठी निघाले होते. हे सर्व मजूर टाटा एस गाडीत बसून रात्री नऊच्या सुमारास गावातून रवाना झाले होते.
पहाटेच्या सुमारास, म्हणजे साधारण पाच वाजता, समृद्धी महामार्ग क्र. 116 वर शिवनी परिसरात दाट धुके पसरलेले होते. त्याच वेळी लघुशंकेसाठी चालकाने टाटा एस गाडी महामार्गाच्या कडेला उभी केली. दरम्यान, मागून येणाऱ्या वेगवान आयशर ट्रकने या उभ्या टाटा एस गाडीला जबर धडक दिली. अपघात इतका भीषण होता की गाडीचे पुढील चकनाचूर झाले आणि आत बसलेले सहा मजूर गंभीररित्या जखमी झाले.
जखमींमध्ये राहुल पुराम, उर्मिला शेंडे, अश्विन भानरकर, सविता शेंडे, मंदा नैतराम आणि छत्रपती खासेकर या मजुरांचा समावेश आहे.
जखमींना तात्काळ धामणगाव रेल्वे ग्रामीण रुग्णालयात प्राथमिक उपचारासाठी दाखल करण्यात आले असून, त्यानंतर त्यांना पुढील उपचारासाठी रेफर करण्यात आले आहे. या अपघातामुळे समृद्धी महामार्गावरील प्रवाशांमध्ये एकच भीतीचे वातावरण निर्माण झाले असून, महामार्ग पोलिसांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि पुढील तपास सुरू केला आहे.



