अंबादास दानवे यांच्या बैठकीसाठी हॉल न दिल्याने शासकीय विश्रामगृहाचा दरवाजा फोडला

लातूर : लातूर शहरातील राजीव गांधी चौक येथील नवीन शासकीय विश्रामगृहात आज सकाळी शिवसेनेच्या (उद्धव ठाकरे गट) आढावा बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीस विधान परिषद विरोधी पक्षनेते तथा शिवसेना नेते अंबादास दादा दानवे, माजी आमदार रोहिदास चव्हाण तसेच जिल्ह्यातील महिला आघाडी, युवासेना आणि संलग्न संघटनांचे पदाधिकारी उपस्थित राहणार होते. मात्र, शासकीय विश्रामगृह प्रशासनाने बैठक घेण्यासाठी हॉल उपलब्ध करून देण्यास नकार दिल्याने शिवसेना कार्यकर्ते संतप्त झाले. या वादातून काही कार्यकर्त्यांनी संतापाच्या भरात विश्रामगृहाच्या प्रवेशद्वारावरील काचेचा दरवाजा फोडला. घटनेचा संपूर्ण प्रकार सीसीटीव्हीत कैद झाला फुटेज CITY NEWS ला प्राप्त झाले. अंबादास दानवे यांच्या ‘मराठवाडा व्यापी आंदोलन आणि हंबरडा’ या बैठकीच्या पार्श्वभूमीवर ही तोडफोड झाल्याने राजकीय तापमान चांगलेच वाढले आहे. शासकीय संपत्तीची नासधूस केल्याबद्दल कार्यकर्त्यांवर कारवाई होणार का, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पोलीसही या घटनेचा तपास करत असून सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपींची ओळख पटविण्याचे प्रयत्न सुरू आहेत.



