साखरेने भरलेला ट्रक चोरी करणारा शातिर ड्रायव्हर गजाआड

गिट्टीखदान पोलीस ठाण्याच्या हद्दीत काही दिवसांपूर्वी साखरेने भरलेला एक ट्रक चोरीस गेल्याची तक्रार दाखल करण्यात आली होती. या घटनेनंतर वरिष्ठ पोलिसांच्या मार्गदर्शनाखाली तपास सुरू करण्यात आला. तांत्रिक साधनांचा वापर करून आणि गुप्त बातमीदारांच्या माध्यमातून पोलिसांना माहिती मिळाली की, या चोरीच्या घटनेत स्थानिक तरुण ऋषभ गोविंद निवनाथे याचा सहभाग आहे. पोलिसांनी तत्काळ सापळा रचून त्याला गिट्टीखदान परिसरातून ताब्यात घेतलं. अटक केल्यानंतर त्याच्या चौकशीत समोर आलं की, आरोपीला पैशांची गरज होती आणि स्वतःच्या विलासी शौकांची पूर्तता करण्यासाठी त्याने हा ट्रक चोरीस नेला. ऋषभ स्वतः ट्रक ड्रायव्हर असल्याने त्याला ट्रक कसा चालवायचा, चावीशिवाय वाहन कसं सुरू करायचं याचं उत्तम ज्ञान होतं. त्याने या ज्ञानाचा वापर करून थेट ट्रक सुरू केला आणि पळ काढला. या ट्रकमध्ये साखरेची तब्बल 130 पोती होती, प्रत्येकी 50 किलो वजनाची. पोलिसांनी आरोपीकडून संपूर्ण ट्रक आणि सर्व साखरेची पोती हस्तगत केली आहेत. सदर प्रकरणातील एकूण मालमत्तेची किंमत सुमारे 50 लाख रुपये असल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे — यात 35 लाखांचा ट्रक आणि 15 लाखांची साखर होती. या तपासात पीएसआय खाडे यांच्या नेतृत्वाखालील डीबी टीमने अत्यंत मेहनत घेत अवघ्या 12 ते 13 तासांत आरोपीला गजाआड केलं. पोलिस निरीक्षक कैलाश देशमाने (PI) यांनी याबाबत माहिती दिली



