अर्जुनी मोरगावमध्ये अवकाळी पावसाने धान पीक उद्ध्वस्त

गोंदिया – दिनांक ५ ऑक्टोबर रोजी रात्री अर्जुनी मोरगाव तालुक्यात अचानक झालेल्या अवकाळी पावसाने शेतकऱ्यांच्या संकटात आणखीनच भर घातली. मुसळधार पावसामुळे धान पीक पूर्णपणे जमीनदोस्त झाले आहे. या भागातील शेकडो शेतकऱ्यांचे लाखो रुपयांचे नुकसान झाले आहे. निसर्गाच्या या लहरीपणामुळे अनेक शेतकऱ्यांवर उपासमारीची वेळ आली आहे. पिकांचे नुकसान पाहून अनेक शेतकरी हताश झाले असून, काही ठिकाणी आत्महत्येचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर अन्नदाता धान उत्पादक शेतकरी संघाने तहसीलदार कार्यालयात धडक देत निवेदन सादर केले. या निवेदनात शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई मिळावी, पंचनामे त्वरित करावेत आणि शासनाने मदतीसाठी पुढे यावं अशी ठाम मागणी करण्यात आली. शेतकऱ्यांनी स्पष्ट इशारा दिला आहे की जर वेळेत मदत न मिळाल्यास तीव्र आंदोलन छेडण्यात येईल. शासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देण्याची गरज आहे. प्रशासन आणि शासन यांच्याकडून अद्याप कोणतीही ठोस मदत न मिळाल्याने शेतकऱ्यांमध्ये तीव्र नाराजी आहे. आता पाहावं लागेल की शासन यावर काय निर्णय घेते.



