अमरावतीत दोन दुर्मिळ व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वी

अमरावती : सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, अमरावती येथे दोन अत्यंत दुर्मिळ व गुंतागुंतीच्या शस्त्रक्रिया यशस्वीरित्या पार पडल्या आहेत. या शस्त्रक्रियांमुळे दोन महिलांचे प्राण वाचले असून, रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांचे कौशल्य पुन्हा एकदा अधोरेखित झाले आहे.
पहिल्या प्रकरणात, वलगाव येथील 30 वर्षीय महिला तीव्र पोटदुखीच्या तक्रारीसह विभागीय संदर्भ सेवा रुग्णालयात दाखल झाली. प्राथमिक तपासणी व सीटी स्कॅननंतर तिच्या पोटात 25 x 20 x 15 से.मी. आकाराची अंडाशयाची गाठ आढळून आली. सदर गाठ मूत्रवाहिनी, मूत्राशय व ओमेंटमला चिकटलेली होती, त्यामुळे शस्त्रक्रिया अत्यंत जटिल होती. तरीही, ऑन्कोसर्जन डॉ. आयुष हेडा यांच्या नेतृत्वाखाली व डॉ. अमोल नरोटे (वैद्यकीय अधीक्षक) व डॉ. मंगेश मेंढे (विशेष कार्य अधिकारी) यांच्या मार्गदर्शनाखाली शस्त्रक्रिया यशस्वी झाली. गाठ कोणत्याही गुंतागुंतीशिवाय काढण्यात आली असून रुग्ण उत्तम प्रकृतीत आहे.
दुसऱ्या प्रकरणात, धारणी येथील 27 वर्षीय महिला 30 x 32 x 20 से.मी. आकाराच्या पोटातील गाठीसह रुग्णालयात दाखल झाली होती. तिला रक्तक्षय होता, त्यामुळे प्रथम रक्तदान करून रुग्ण स्थिर करण्यात आला. शस्त्रक्रियेदरम्यान ही गाठ चौथ्या टप्प्यातील कर्करोगाची असल्याचे निदर्शनास आले. तरीही संपूर्ण गाठ यशस्वीरीत्या काढण्यात आली. रुग्ण पूर्णपणे बरी झाली असून तिला डिस्चार्ज देण्यात आला आहे. पुढील केमोथेरपीचे उपचार विभागीय रुग्णालयात सुरू राहणार आहेत. ही शस्त्रक्रिया महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत विनामूल्य करण्यात आली.
या दोन्ही शस्त्रक्रियेमध्ये डॉ. अतुल यादगिरे, बधिरीकरण तज्ञ डॉ. सपना अग्रवाल, ऑन्कोलॉजी नोडल ऑफिसर डॉ. रोहिणी राठोड, डॉ. किरण पारीसे, डॉ. ऐश्वर्या, डॉ. साक्षी सपकाळ, माधुरी गाडेकर, मेट्रण चंदा खोडके आणि इतर नर्सिंग व सहाय्यक कर्मचाऱ्यांचे मोलाचे योगदान लाभले.
या यशस्वी शस्त्रक्रिया विभागीय संदर्भ सेवा रुग्णालय, अमरावती येथील वैद्यकीय सेवा व पायाभूत सुविधांची गुणवत्ता अधोरेखित करतात.



