अभिजात मराठीच्या जतन आणि संवर्धनासाठी सर्वांनी प्रयत्न करणे गरजेचे - प्रा. वसंत आबाजी डहाके

विद्यापीठात अभिजात मराठी भाषा दिवस उत्साहात साजरा
गाथासप्तशती ज्या भाषेत निर्माण झाला ती अभिजात मराठी अतिशय संपन्न भाषा
अमरावती – (दि. 04.10.2025) : मराठीला दोन हजार वर्षांपूर्वीचा इतिहास असून गाथासत्तसई (गाथासप्तशती) या ग्रंथात महाराष्ट्रीची म्हणजे तत्कालीनमराठीची रूपे सापडतात. मराठीच्या विद्यार्थ्यांनी एकदा तरी गाथासप्तशती वाचायला पाहिजे. त्यातील कित्येक रूपे नंतरच्या मराठीत आलेली आहेत. मराठीमध्ये वेगवेगळ्या टप्प्यांवर भर पडत गेली असून मराठी संतांनी त्या त्या भागातील शब्द अभंगांतून आणल्यामुळे संतांचं बोलणं कठीण वाटत नाही, असे प्रतिपादन प्रा. वसंत आबाजी डहाके यांनी अभिजात मराठी भाषा दिवसानिमित्त संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठात केले.
आपल्या भाषणातून त्यांनी पुढे म्हटले की,ज्याच्याजवळ भाषा तो माणूस, माणसाच्या याव्याख्येवरून भाषेचे अनन्यसाधारण महत्त्व कळते. ३ ऑक्टोबर हा मराठीच्या गौरवाचा दिवस आहे. २०२४ साली या दिवशी मराठीला अभिजात भाषेचा दर्जा मिळाला. मात्र अभिजात भाषेचा दर्जा मिळाल्यावर त्याच्यासाठी विविध तरतुदी तत्परतेने झाल्या पाहिजे.मराठी मुलगा मागे राहता कामा नये. त्याने सगळं ज्ञान घेतलं पाहिजे. त्यासाठी मराठी भाषेत जागातिक शिक्षण उपलब्ध झाले पाहिजे. बोलीतून अनेक पिढ्यांचे ज्ञान जतन केले गेले असल्यामुळे बोलींचेदेखील संवर्धन झाले पाहिजे.
सदर कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान ज्येष्ठ कवयित्री प्रभा गणोरकर यांनी भूषविले. अध्यक्षपदावरून बोलताना त्यांनी कुवलयमाला या ग्रंथाचा संदर्भ देत,दिले, घेतले असे बोलणाऱ्या,धट्टेकट्टे, शूर म्हटल्या गेलेल्या ५ व्या शतकातील मराठी माणसाचे वर्णन सांगितले. अभिजात मराठीचा विचार करताना,मराठीने अनेक भाषांतून शब्द घेतले असल्याची जाणीव ठेवावी.मराठी बोलीत गोडवा असून आपण आपल्या घरातली भाषा टिकवली पाहिजे. न्हाणी, मोरी, स्वयंपाकघर, बीरवांगे (कच्चे टमाटे) असे शब्द आपण टिकवले पाहिजे, इत्यादी मार्गदर्शन त्यांनी याप्रसंगी केले.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रा. डॉ. मोना चिमोटे यांनी करत कार्यक्रमामागील भूमिका विषद केली. आपल्या प्रास्ताविकातून त्यांनी अभिजात शब्दाच्या व्युत्पत्तीवरदेखील प्रकाश टाकला. सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन अभिजित इंगळे याने केले. कार्यक्रमास प्रसिद्ध कवी सुनील यावलीकर, प्रा. माधव पुटवाड, डॉ. प्रणव कोलते तसेच विभागातील अंशदायी शिक्षक, संशोधक विद्यार्थी आणि विविध पदव्युत्तर विभागांतील विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.



