AmravatiLatest NewsMaharashtra Politics

शेतकऱ्यांसाठी आंदोलन करणाऱ्या पदाधिकाऱ्यांवर दंग्याचे गुन्हे दाखल करणे हा तर पोलिसांचा जनते प्रती केलेला द्रोह- डॉ.सुनील देशमुख 

शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांनी  शेतकऱ्यांसाठी आंदोलन केले म्हणून दंगा केल्याचा गुन्हा दाखल केल्या प्रकरणी डॉ. सुनील देशमुख यांचा पोलीस प्रशासनावर कटाक्ष 

संपूर्ण देशात कायदा समान असताना अमरावतीत मात्र त्याचा असमान वापर होत असल्याचा आरोप माजी पालकमंत्री व काँग्रेस नेते डॉ. सुनील देशमुख यांनी केला आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) गटाच्या पदाधिकाऱ्यांनी अतिवृष्टीमुळे सोयाबीन पिकाच्या झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात तीव्र आंदोलन केले होते. यावेळी सडलेल्या सोयाबीन चे झाडं निषेध म्हणून कार्यालयात टाकण्यात काळी होती. मात्र, या आंदोलनानंतर शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांवर पोलिसांनी दंगा केल्याचा गंभीर गुन्हा दाखल केला आहे. पोलिसांची ही कृती म्हणजे  पोलिस प्रशासनाचा हा जनतेप्रती द्रोह असून कायद्याचा गैरवापर करून जनआंदोलन दडपण्याचे कारस्थान असल्याचे नमूद करीत आपला रोष व्यक्त केला आहे.   याउलट, काही महिन्यांपूर्वी सत्ताधारी पक्षाच्या   पदाधिकाऱ्यांनी बोगस बीटी बियाण्यांप्रकरणी जिल्हा कृषी अधीक्षक कार्यालयात आंदोलन करताना कृषी अधिकाऱ्यांवर  बियाण्यांचा मारा केला होता. त्या वेळी मात्र पोलिसांनी सौम्य कारवाई करत गंभीर गुन्हे दाखल केले नव्हते. हा पोलीस प्रशासनाचा दुटप्पीपणा असून, “संपूर्ण देशात कायदा समान असताना अमरावतीत तो असमान का?” असा रोखठोक सवाल डॉ. सुनील देशमुख यांनी उपस्थित केला आहे.डॉ. देशमुख यांनी अमरावती शहर पोलीस प्रशासनाच्या कारभारावर टीका करताना, हफ्तेखोरी आणि अवैध धंद्यांमुळे शहराची कायदा-सुव्यवस्था चव्हाट्यावर आल्याचा आरोप केला. शासनातील आणि विरोधी पक्षातील नेत्यांना दुजाभावाची वागणूक दिली जात असल्याचे त्यांनी नमूद केले. “ज्यांचे स्वतःचे घर काचेचे आहे, त्यांनी असे वर्तन करू नये,” असा कटाक्ष त्यांनी पोलीस प्रशासनाला उद्देशून काढला.शेतकरी, शेतमजूर आणि जनतेच्या हितासाठी आंदोलने करणाऱ्या विरोधी पक्षांवर गंभीर गुन्हे दाखल करून त्यांचा आवाज दडपण्याचा प्रयत्न शासन करत असेल, तर जनता त्याविरोधात पेटून उठेल, असा इशारा डॉ. देशमुख यांनी दिला. तसेच, शिवसेना (उबाठा) पदाधिकाऱ्यांवरील दंग्याचे गुन्हे तातडीने मागे घ्यावेत, अशी मागणी त्यांनी प्रशासनाकडे केली आहे.महाविकास आघाडीतील काँग्रेस, शिवसेना (उबाठा) आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार) हे घटक पक्ष एकसंघ असून, शेतकरी, शेतमजूर आणि जनतेच्या न्याय व हितासाठी भविष्यातही महाविकास आघाडी तीव्र आंदोलने करून  अग्रेसर भूमिका घेत राहतील, असे डॉ. सुनील देशमुख यांनी ठामपणे नमूद केले.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button