विद्यापीठातील एम.बी.ए. विभागात आर्थिक गुंतवणूक जागरुकता कार्यक्रम संपन्न

अमरावती – (दि. 01.10.2025) : संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील व्यवसाय प्रशासन व प्रबंधन विभागात (एम.बी.ए.) राष्ट्रीय शेअर बाजार यांच्या सहकार्याने नुकताच विद्याथ्र्यांसाठी आर्थिक गुंतवणूक जागरुकता कार्यक्रम संपन्न झाला. विद्याथ्र्यांना व्यावहारिक आर्थिक साक्षरता, कौशल्यासह सज्ज करणे, जेणेकरुन विद्यार्थी आर्थिक गुंतवणुकीचे निर्णय घेऊ शकतील आणि भविष्यातील आव्हानांना सामोरे जावू शकतील, या उद्देशाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी श्री शशांक मिश्रा, प्रा. विरेंद्र ऑगस्टीन प्रामुख्याने उपस्थित होते.
श्री शशांक मिश्रा यांनी यावेळी गुंतवणूक, आर्थिक नियोजन, बाजारातील चढउतार यावर विद्याथ्र्यांना मार्गदर्शन करतांना शेअर बाजार आणि व्यापार, म्युचुअल फंड, डेरिव्हेटिव्हज्, तांत्रिक विश्लेषण, आर्थिक शिक्षणासाठी प्रगत एक्सेल, मूलभूत विश्लेषण यावर सविस्तरपणे मार्गदर्शन केले. तर प्रा. विरेंद्र ऑगस्टीन यांनी विभागामधील 44 विद्यार्थी सध्या विविध प्रतिष्ठीत कंपन्यांमध्ये दाखल झाले असल्याचे सांगून आर्थिक साक्षरता, करिअर, आणि मुलाखतीमधील संबंध विद्याथ्र्यांना सांगितला.
कुलगुरू डॉ. मिलींद बारहाते, प्र-कुलगुरू डॉ. महेंद्र ढोरे यांनी सदर उपक्रमाचे भरभरुन कौतुक केले. तर कुलसचिव डॉ. अविनाश असनारे यांनी उपक्रमाचे कौतुक करतांना एम.बी.ए. विभागाकडून गुंतवणूक दक्षता कार्यक्रम एक उत्कृष्ट सुरुवात असल्याचे सांगितले. विभागप्रमुख डॉ. दिपक चाचरकर यांनी आर्थिक शिस्त, धोरणात्मक नियोजन आणि दिर्घकालीन दृष्टिकोन यावर विद्याथ्र्यांना मार्गदर्शन केले. संत गाडगे बाबा यांच्या प्रतिमेचे पूजन व दीपप्रज्वलन करुन कार्यक्रमाची सुरुवात झाली. सूत्रसंचालन कु. ममता पारसकर यांनी केले.



