Latest NewsMaharashtraPune

पाळीव म्हशीपासून ‘रानगवा’ जन्मला? पुण्यातील घटनेने उडाली खळबळ

पुणे : पुण्याच्या भोर तालुक्यातील रायरेश्वर मंदिराजवळील माळवाडी येथे घडलेली एक घटना ऐकून आणि पाहून संपूर्ण तालुका थक्क झाला आहे. वाघमारे कुटुंबाच्या पाळीव म्हशीने जन्म दिलेले रेडकू हे साधारण म्हशीसारखे नसून त्याचे स्वरूप रानगव्याप्रमाणे आहे. शरीराचा रंग काळा आणि पांढरा मिश्रित, मजबूत अंगकाठी, डोक्यावरील रचना, पायावरील पांढरा रंग आणि डोळ्यांतील चमक पाहून हे बछडे रानगव्याशी साम्य असलेले असल्याचे स्पष्ट होते. पुणे जिल्ह्यात ही केवळ दुसरीच घटना असून यापूर्वी अशीच घटना सुस बावधन भागात घडली होती.

या घटनेची माहिती ज्येष्ठ सर्पमित्र व पुणे जिल्हा वन्य प्राणी व सर्प रक्षक असोसिएशनचे सदस्य तबरेज खान यांना मिळताच त्यांनी त्वरित वनविभागाशी संपर्क साधला. यानंतर वन अधिकारी इंगवले आणि वन अधिकारी भोई यांनी घटनास्थळी दाखल होऊन प्राथमिक पाहणी केली. निरीक्षणानंतर हे बछडे रानगव्याच्या वैशिष्ट्यांसह असल्याचे स्पष्ट झाले. आता त्याचा नेमका वांशिक संबंध निश्चित करण्यासाठी डीएनए तपासणी व रक्त परीक्षण करण्यात येणार आहे. त्यानंतरच बछड्याला त्याच ठिकाणी ठेवायचे की ट्रान्झिट सेंटर अथवा वन्यजीव संवर्धन केंद्रात हलवायचे याचा निर्णय घेतला जाणार आहे.

विशेष म्हणजे पाळीव म्हैस आणि रानगव्याच्या संगमातून जन्मलेले बछडे म्हणजे एक अत्यंत दुर्मिळ जैविक घटना आहे. अशा संकरातून जन्मलेल्या पिल्ल्यांच्या वाढीमान, प्रजननक्षमता आणि भविष्यातील अस्तित्वाबाबत नेहमीच शास्त्रीय शंका निर्माण होतात. म्हणूनच वनविभागाकडून या घटनेचा सखोल अभ्यास होणे आवश्यक आहे.

या प्रसंगी सर्पमित्र तबरेज खान यांच्यासोबत सर्पमित्र विशाल शिंदे देखील उपस्थित होते. त्यांनी स्थानिक शेतकऱ्यांसोबत समन्वय साधत वनविभागाशी संपर्क ठेवला.

रायरेश्वर मंदिर हा छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्य स्थापनेची पहिली शपथ घेतलेला ऐतिहासिक परिसर आहे. अशा ऐतिहासिक व निसर्गसंपन्न क्षेत्रात पाळीव म्हशीला रानगव्यापासून बछडे झाल्याची ही घटना घडणे केवळ पुणे जिल्ह्यातीलच नव्हे तर महाराष्ट्रातील दुर्मिळ घटनांपैकी एक मानली जात आहे. स्थानिकांनीही या घटनेला निसर्गाची अद्भुत देणगी मानत उत्साहाने चर्चा केली असून आता वनविभागाचा निर्णय व वैज्ञानिक तपासणी याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

रायरेश्वर किल्ल्यावरील जंगल परिसरात रानगवा, बिबट्या, अस्वलासह इतर जंगली प्राण्यांचा वावर आहे.जंगल परिसरात म्हशी जंगलात चरण्यासाठी सोडलेल्या असताना, पाळीव म्हैस आणि रानगवा यांच्यात झालेल्या संगमातून हा बछडा जन्मला आल्याची प्राथमिक माहिती प्राणी अभ्यासकांकडून दिली गेलीय.

Show More

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button