“युवा धोरण हे युवकांसाठी नव्हे, युवकांनीच घडवायचं” – मंत्री कोकाटे यांचा विश्वास

राज्याचे सर्वसमावेशक युवा धोरण तरुणांच्या सहभागातून साकारणार – मंत्री माणिकराव कोकाटे
मुंबई : राज्यातील तरुण-तरुणींच्या सक्रिय सहभागातून महाराष्ट्र शासनाने सर्वसमावेशक युवा धोरण साकारण्याचा निर्णय घेतला असून, शैक्षणिक, सामाजिक, सांस्कृतिक, कौशल्य विकास या सर्व पैलूंवर आधारित तरुणांच्या सूचना घेऊन हे धोरण तयार करण्यात येणार आहे. अशी माहिती क्रीडा व युवक कल्याण मंत्री ॲड. माणिकराव कोकाटे यांनी दिली.
मंत्रालयात पार पडलेल्या राज्य युवा धोरण आढावा बैठकीत त्यांनी सांगितले की, “युवकांना शिक्षण, रोजगार आणि सामाजिक- बौद्धिक उपक्रमांमध्ये अधिक सक्रिय करण्यासाठी धोरणात विशेष तरतुदी असतील. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत हे धोरण पोहोचवणं गरजेचं आहे.”
धोरणासाठी युवकांचे थेट योगदान
राज्यातील प्रत्येक भागातील, विशेषतः ग्रामीण भागातील तरुणांनाही व्यासपीठ मिळावं यासाठी विशेष उपक्रम राबवले जातील. महिला व बालविकास, सांस्कृतिक कार्य, कौशल्य विकास आदी विभागांच्या समन्वयातून नाविन्यपूर्ण योजनांचा समावेश केला जाईल.
धोरणाचे महत्त्वाचे मुद्दे:
शारीरिक, मानसिक आणि भावनिक आरोग्य
मानसिक कल्याण व व्यसनमुक्ती
शिक्षण व डिजिटल कौशल्य विकास
रोजगार व उपजीविकेच्या संधी
कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) व सायबर सुरक्षा
तरुणांसाठी स्पर्धात्मक उपक्रम आणि संवाद
तरुणांमधून थेट सूचना मागवणार
राज्यातील तरुणांमधून थेट सुचना मागवण्यासाठी विविध माध्यमांतून स्पर्धात्मक उपक्रम राबवले जातील, असेही ॲड. कोकाटे यांनी स्पष्ट केलं. युवक धोरण समितीच्या बैठकीस अपर मुख्य सचिव अनिल डिग्गीकर, आयुक्त शीतल तेली-उगले, पद्मश्री कांती शहा, आमदार सत्यजीत तांबे, तसेच राज्यातील युवा पुरस्कार विजेते, युवक संघटनांचे प्रतिनिधी आणि विविध क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.



