चप्पल न घालण्यामागचं धार्मिक कारण काय? नवरात्रीच्या नियमांमागील सत्य

नवरात्रीमध्ये अनेकजण नऊ दिवसांचा उपवास ठेवतात. तर बरेचजण चप्पल घालत नाहीत. उपवास ठेवणे ही सामान्य बाब असली तरी नवरात्रीच्या काळात अनेकजण चप्पल का घालत नाहीत? यामागील कारण अनेकांना ठाऊक नाही. याबद्दलच आज आपण जाणून घेणार आहेत.
नवरात्रीचा चप्पल न वापरण्याशी काय संबंध?
तर नवरात्रीमध्ये चप्पल न घालण्यामागे धार्मिक आणि सांस्कृतिक कारणं आहेत. नवरात्री हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहे. हा सण देवी दुर्गेच्या पूजेसाठी समर्पित केलेला आहे. या काळात देवीचे भक्त उपवास, पूजा, आणि धार्मिक विधी करतात. या माध्यमातून शुद्धता आणि पवित्रता राखण्यावर विशेष भर दिला जातो. मात्र या साऱ्याचा चप्पल न वापरण्याशी काय संबंध आहे असा प्रश्न पडणं सहाजिक आहे. नवरात्रीच्या काळात चप्पल न घालण्यामागे चार ते पाच महत्त्वाची कारणं आहेत. ही कारणं कोणती आणि या नऊ दिवसांमध्ये चप्पल न वापरण्यामागील कारणं कोणती ते पाहूयात…
पवित्रतेचे प्रतीक: चप्पल न घालणे हे शारीरिक आणि आध्यात्मिक शुद्धतेचे प्रतीक मानले जाते. अनवाणी राहिल्याने पाय थेट जमिनीच्या संपर्कात येतात, ज्यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा ग्रहण करण्यास मदत होते असे मानले जाते. त्यामुळे या नऊ पवित्र दिवसांमध्ये अनेकजण चप्पलेचा त्याग करतात.
देवीप्रती आदर: नवरात्रीमध्ये देवीच्या मंदिरात किंवा पूजास्थळी प्रवेश करताना चप्पल काढली जाते, कारण ती जागा पवित्र मानली जाते. काही भक्त देवीप्रती आपला आदर आणि भक्ती व्यक्त करण्यासाठी संपूर्ण नऊ दिवस अनवाणी राहतात.
आध्यात्मिक अनुशासन: अनवाणी राहणे हे एक प्रकारचे तप किंवा अनुशासन मानले जाते. या माध्यमातून साधेपणा आणि संयम राखण्याची शिकवण मिळते.
परंपरा आणि रूढी: काही कुटुंबांमध्ये किंवा समुदायांमध्ये ही प्रथा पिढ्यानपिढ्या चालत आली आहे. यामुळे नवरात्रीच्या काळात चप्पल न घालणे ही एक परंपरा झाली आहे.
प्रकृतीशी नाते: अनवाणी चालणे हे पृथ्वीशी जोडले जाण्याचे प्रतीक मानले जाते. असे मानले जाते की यामुळे शरीरातील ऊर्जा संतुलित राहते आणि मन शांत राहते. म्हणूनही या काळात चप्पल न वापरणाऱ्यांची संख्या भरपूर मोठी असल्याचं दिसून येतं.
वरील कारणं असली तरी चप्पल न घालण्याची ही प्रथा प्रत्येक व्यक्ती किंवा समुदायानुसार बदलू शकते. काही लोक केवळ मंदिरात किंवा पूजेच्या वेळी चप्पल काढतात, तर काही संपूर्ण नवरात्री अनवाणी राहतात. हे सर्वस्वी भक्ती आणि श्रद्धेवर अवलंबून आहे, हे लक्षात घेणं अत्यंत गरजेचं आहे.



