विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरला जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांची भेट

वुमेन्स स्टडीज सेंटर येथे जेंडर, मीडिया अँडकल्चर यावर विद्यार्थ्यांशी चर्चा व संवाद संपन्न
विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटरला जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशनच्या विद्यार्थ्यांची भेट
संत गाडगे बाबा अमरावती विद्यापीठातील वुमेन्स स्टडीज सेंटर येथे श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती येथील जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन या पदवी आणि पदव्युत्तर अभ्यासक्रमाला प्रवेशित विद्यार्थ्यांनी भेट दिली. या दरम्यान जेंडर, मीडिया अँड कल्चर यांतील आंतरसंबंधावर विद्यार्थ्यांशी चर्चा व संवाद साधण्यात आला. यावेळी वुमेन्स स्टडीज सेंटरच्या संचालक डॉ. वैशाली गुडधे, सेंटरमधील डॉ. भगवान फाळके, श्री शिवाजी कला व वाणिज्य महाविद्यालय, अमरावती येथील ग्रंथपाल डॉ. महेंद्र मेटे, यांसह महाविद्यालयातील जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन या अभ्यासक्रमाचे प्रा. मनीष भंकाळे आणि प्रा. रुपेश फसाटे उपस्थित होते. सुरुवातीला प्रा. मनीष भंकाळे यांनी महाविद्यालय, अभ्यासक्रम आणि विद्यार्थ्यांचा परिचय उपस्थितांना करून दिला. तसेच विद्यार्थ्यांच्या भेटीचे प्रयोजन स्पष्ट केले.
वुमेन्स स्टडीज सेंटरच्या संचालक डॉ. वैशाली गुडधे यांनी प्रसारमाध्यमांचे बदलते स्वरूप आणि स्त्रियांच्या प्रश्नांचे वार्तांकन यावर विचार मांडले. तसेच मागील पंधरा वर्षातील वुमेन्स स्टडीज सेंटरमधील महत्त्वपूर्ण कार्यक्रम व उपक्रमांची माहिती देखील दिली. सेंटर अंतर्गत चालवण्यात येणाऱ्या एम.ए. जेंडर अँड वुमेन्स स्टडीज या अभ्यासक्रमातील एक पेपर ‘जेंडर, मीडिया अँड कल्चर’ हा असून त्यातील घटकांची माहिती त्यांनी यावेळी दिली.तर डॉ. भगवान फाळके यांनी सेंटरची पार्श्वभूमी, प्रगती आणि महत्त्वपूर्णता याविषयी माहिती दिली. डॉ. महेंद्र मेटे यांनी क्षेत्र भेटीची आवश्यकता स्पष्ट करून वुमेन्स स्टडीज सेंटरला दिलेल्या भेटीची मौलिकता आपल्या मांडणीतून व्यक्त केली.
या भेटी दरम्यान विद्यार्थ्यांसोबत प्रश्नोत्तरे, चर्चा व संवाद संपन्न झाला. समाजातील लैंगिक असमानता नष्ट करण्यासाठी प्रसारमाध्यमांची भूमिका महत्त्वपूर्ण आहे. आजवर विविध वृतपत्रे, नियतकालिके आणि वाहिन्यांवरून स्त्रियांच्या समस्यांवर बातम्या, मुलाखती, विविध कार्यक्रम प्रसारित/ प्रकाशित करून माध्यमांनी महिला सक्षमीकरण व लिंगभाव संवेदनशीलता विकासात योगदान मौलिक दिले आहे. चित्रपट व मालिकांमधून स्त्रियांचे होणारे चित्रण संमिश्र असले तरी त्यांतील काहींनी स्त्रियांच्या प्रश्नांना आवश्यकता यथार्थपणे अभिव्यक्त केले आहे. जेंडर, मिडिया आणि कल्चर हे एकमेकांवर प्रभाव टाकणारे घटक असून त्यातील आंतरसंबंधाचा अभ्यास लिंगभाव दृष्टीकोनातून अधिक होण्याची आवश्यकता आहे, अशी विविध मते या संवादातून व्यक्त झाली. या दरम्यान सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन महाविद्यालयाचे प्रा. रुपेश फसाटे यांनी केले.



