गो. से. महाविद्यालयात स्व. ॲड. शंकररावजी भाऊसाहेब बोबडे जयंती उत्सवानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन

स्थानिक विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव द्वारा संचालित गो. से. विज्ञान, कला व वाणिज्य महाविद्यालय खामगाव तर्फे दिनांक १८ सप्टेंबर ते २४ सप्टेंबर २०२५ दरम्यान स्व. ॲड. भाऊसाहेब उपाख्य शंकररावजी बोबडे जयंती उत्सव विविध सामाजिक, शैक्षणिक आणि सांस्कृतिक उपक्रमांच्या माध्यमातून मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येत आहे. या आठवडाभर चालणाऱ्या उपक्रमांपैकी सर्वात महत्त्वाचा व समाजोपयोगी उपक्रम म्हणजे रक्तदान शिबिराचे आयोजन होय. हे आयोजन राष्ट्रीय छात्र सेना तसेच राष्ट्रीय सेवा योजना यांच्या संयुक्त विद्यमाने महाविद्यालय मध्ये आयोजित करण्यात येत आहे दिनांक २४ सप्टेंबर 2025 बुधवार रोजी सकाळी १०.०० वाजता या शिबिरास सुरुवात होणार आहे. या वेळी खामगाव सामान्य रुग्णालय येथील रक्त संकलन अधिकारी यांची विशेष वैद्यकीय टीम शिबिरामध्ये प्रत्यक्ष उपस्थित राहून रक्तदान प्रक्रिया पार पाडणार आहे. या शिबिरात महाविद्यालयातील विद्यार्थी, प्राध्यापकवर्ग, माजी विद्यार्थी तसेच परिसरातील नागरिक मोठ्या संख्येने सहभागी होण्याची अपेक्षा आहे. समाजासाठी उपयुक्त ठरणाऱ्या या कार्यात सर्वांनी स्वयंस्फूर्तीने पुढाकार घ्यावा, असे आवाहन आयोजकांतर्फे करण्यात आले आहे. या शिबिराच्या उद्घाटन सोहळ्यास मा. डॉ. सुभाष बोबडे (अध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), मा. प्रकाश तांबट (उपाध्यक्ष, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), मा. डॉ. प्रशांत बोबडे (सचिव, विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), मा. अजिंक्य बोबडे (कोषाध्यक्ष,विदर्भ शिक्षण प्रसारक मंडळ खामगाव), आणि प्राचार्य डॉ. धनंजय तळवणकर विशेष उपस्थित राहणार आहेत. याशिवाय या सप्ताहाचे समन्वयक डॉ. देवेंद्र व्यास आणि विविध उपक्रमांना दिशा देणारे प्रभावित प्राध्यापक देखील या प्रसंगी उपस्थित राहून मार्गदर्शन करणार आहेत. शिबिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते होणार असून, सर्व पाहुण्यांचे स्वागत, सत्कार आणि मार्गदर्शनानंतर प्रत्यक्ष रक्तदान उपक्रमास प्रारंभ होईल. रक्तदात्यांच्या नोंदणीपासून ते वैद्यकीय तपासणी, रक्तसंकलन आणि दात्यांच्या सन्मानपर कार्यक्रमाची संपूर्ण व्यवस्था महाविद्यालय प्रशासन आणि स्वयंसेवकांनी केली आहे. “रक्तदान हे श्रेष्ठदान” या सामाजिक भावनेतून दरवर्षीप्रमाणे या वर्षीही महाविद्यालयाने हा उपक्रम हाती घेतला आहे. या माध्यमातून केवळ रक्ताची गरज भागवली जात नाही तर तरुण पिढीत सामाजिक जाणीव, जबाबदारी आणि सेवाभावही रुजवला जातो. या उपक्रमाच्या यशस्वीतेसाठी महाविद्यालयाचे प्राचार्य, शिक्षकवर्ग, कर्मचारी तसेच विद्यार्थी, राष्ट्रीय छात्र सेना आणि राष्ट्रीय सेवा योजना सातत्याने परिश्रम घेत आहेत. या शिबिरातून मोठ्या प्रमाणावर रक्तदान होऊन अनेक रुग्णांचे प्राण वाचतील, असा विश्वास आयोजकांनी व्यक्त केला आहे. अशी माहिती प्रसिद्धी पत्रकाद्वारे प्रा. डॉ. मोहम्मद रागीब देशमुख यांनी दिली आहे.



