“चिमुकल्यांसाठी सुरक्षित ठिकाणच असुरक्षित? उल्हासनगरच्या डे-केअरमध्ये धक्कादायक प्रकार”

तुम्हीदेखील मुलाला डे-केअरमध्ये ठेवताय का? तर ही बातमी तुम्हाला सावधान करणारी आहे. कारण उल्हासनगर येथील डे- केअर सेंटरमध्ये एका चिमुकल्याला मारहाण केल्याचा व्हिडिओ समोर आला आहे. चिमुकल्याने कविता म्हणताना टाळ्या वाजवल्या नाही म्हणून शिक्षिकेने चिमुकल्याला मारहाण केली आहे. या प्रकरणी विठ्ठलवाडी पोलिसांनी प्ले ग्रुपची शिक्षिका गायत्री पात्रा हिच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे
उल्हासनगर शहरातील कुर्ला कॅप परिसरातील प्ले ग्रुप मध्ये हा अडीच वर्षाचा चिमुकला शिकत आहे. प्ले ग्रुपच्या शिक्षिकेने या चिमुकल्याला कविता म्हणत टाळ्या वाजवायला सांगितल्या मात्र या चिमुकल्याने काही प्रतिसाद न दिल्याने प्ले ग्रुपमधील शिक्षिका गायत्री पात्र हीने त्या चिमुकल्याच्या कानाखाली मारली. इतकंच नव्हे तक धक्कादायक म्हणजे शिक्षिका एकदा मारून थांबली नाही तर तिने चार वेळा या मुलाच्या कानाखाली मारली त्यामुळे हा चिमुकला भेदरला होता.
हा सर्व घटनाक्रम कॅमेऱ्यात चित्रीत झाला आहे. शिक्षिकेने मारहाण केल्यानंतर तो चिमुकला त्या शिक्षिकेचा हात पकडून विनवणी करू लागला. हा सर्व प्रकार मोबाईलमध्ये चित्रीत झाला आहे. तब्बल एक महिन्यानंतर हा व्हिडिओ मुलाच्या पालकांना मिळाला त्यानंतर पालकांना धक्का बसला त्यांनी तत्काळ विठ्ठलवाडी पोलीस ठाण्यात जाऊन गायत्री पात्र या शिक्षके विरोधात तक्रार दाखल केली.
पालकांच्या तक्रारीनंतर विठ्ठलवाडी पोलिसांनी अल्पवयीन मुलांच्या काळजी आणि संरक्षण कायद्या अंतर्गत शिक्षकेवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फक्त या चिमुकल्यावरच नाही तर त्याच्यासोबत शिकणाऱ्या दुसऱ्या मुलांवरही अशाच प्रकारे मारहाण केल्याचे या पीडित मुलाच्या पालकांनी सांगितलं. तसंच तेव्हा मुलाच्या पालकांनी प्ले ग्रुप च्या संचालकांना सीसीटीव्ही कॅमेऱ्याच फुटेज मागितल तर सदर सीसी टीव्ही कॅमेरा बंद असल्याचे उत्तर या प्ले ग्रुप चालकाने दिले. त्यामुळे यापुढे आपल्या मुलाला जर प्ले ग्रुप मध्ये टाकत असाल तर त्या प्ले ग्रुप ची चौकशी करावी असं आवाहन या पीडित मुलाच्या पालकांनी केलं आहे.
एक महिन्यापासून आपला मुलगा घाबरत असून आजारी पडत आहे मात्र त्याला आपल्याबरोबर घडलेली घटना सांगता आली नाही असेही ते पालक म्हणाले. त्यामुळे या घटनेवरून अशा प्रकारे जर आपण आपल्या पाल्यांना प्लेग्रुप मध्ये टाकत असाल तर सावधान आपल्या सोबतही अशी दुर्दैवी घटना घडू शकते.



