धारणीच्या बाजारात बँक मॅनेजरची मोटरसायकल चोरी, CCTV फुटेजमध्ये कैद

धारणी – धारणी शहरातील शुक्रवारच्या मोठ्या बाजारात ही धाडसी चोरी घडली आहे. बसस्थानक परिसरातील सेंट्रल बँक मॅनेजर आपली मोटारसायकल बँकेच्या मागे पार्क करून बाजारात गेले होते. दरम्यान दुपारी एका अज्ञात युवकाने निर्धास्तपणे मोटरसायकलजवळ येत कोणताही चेहरा न झाकता वाहन सुरू केलं आणि पाहता पाहता गाडी घेऊन पसार झाला. हा संपूर्ण प्रकार तेथील सीसीटीव्ही कॅमेरात स्पष्टपणे कैद झाला आहे. घटनास्थळी त्या वेळी धारणी पोलिस ठाणेदार अवतारसिंग चव्हाण यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस व होमगार्डची गस्त सुरू होती. तरीदेखील चोरट्याने पोलिसांना अक्षरशः खुले आव्हान दिल्यासारखे हे कृत्य केलं आहे. धारणी पोलिसांनी घटनेनंतर तत्काळ सीसीटीव्ही फुटेज जप्त करून आरोपीच्या शोधासाठी मोहीम सुरू केली आहे. आरोपी लवकरच पोलीस जाळ्यात सापडेल असा विश्वास पोलिसांनी व्यक्त केला आहे. ही घटना संपूर्ण बाजारपेठेत चर्चेचा विषय ठरली असून व्यापारी व नागरिकांत भीतीचे वातावरण आहे.”



