टिळा लावा, आधार कार्ड तपासा’; गरबा-दांडियासाठी विश्व हिंदू परिषदेची नवी अट

नवरात्रोत्सव 2025 साठी गरबा आणि दांडिया कार्यक्रमांत फक्त हिंदूंनाच प्रवेश द्यावा, अशी स्पष्ट मागणी विश्व हिंदू परिषदेकडून (VHP) करण्यात आली आहे. आधार कार्ड तपासणी आणि टिळा अनिवार्य करण्याच्या या निर्णयामुळे सध्या मोठं वादंग निर्माण झालं आहे.
गरबा कार्यक्रमासाठी फक्त ‘हिंदूंचा प्रवेश’ – विहिंपचा आग्रह
विश्व हिंदू परिषदेनं आयोजकांकडे स्पष्टपणे मागणी केली आहे की, “गरबा आणि दांडिया कार्यक्रम फक्त हिंदूंसाठीच असावेत.” यासाठी प्रत्येक सहभागी व्यक्तीचे आधार कार्ड तपासावे आणि त्यांना टिळा लावावा, अशा अटी लावण्यात आल्या आहेत.
विहिंपचे म्हणणे आहे की, नवरात्री हा हिंदू धर्मातील एक पवित्र सण आहे आणि ‘लव्ह जिहाद’सारख्या घटनांपासून बचाव करण्यासाठी अशा अटी अनिवार्य आहेत.
गतवर्षीप्रमाणे यंदाही ‘हिंदू ओळख’ तपासणीचा आग्रह
विहिंपच्या या भूमिकेवर आयोजक मंडळांमध्ये मतमतांतर सुरू झाली आहेत. मागील वर्षी जसे काही कार्यक्रमांमध्ये टिळा लावणं आणि ओळखपत्र पाहणं अनिवार्य केलं गेलं होतं, तसंच यंदाही हे अभियान जोरात राबवण्यात येणार आहे. परिषदेकडून आयोजकांना सूचना देण्यात आल्या असून, प्रवेशदरम्यान प्रत्येकाचं आधार कार्ड तपासण्याचा आग्रह करण्यात आला आहे.
सुरक्षेच्या दृष्टीने CCTV ची मागणी
विहिंपसह अनेक मंडळांकडून असा मुद्दा मांडण्यात आला आहे की, “गरबा-दांडियाच्या कार्यक्रमांत गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक सहभागी होऊन गैरप्रकार करतात.” त्यामुळे CCTV कॅमेऱ्यांचा वापर अनिवार्य करावा, अशी मागणीही करण्यात आली आहे.
विशेषतः विदर्भातील अनेक मंडळांनी यावर्षी कार्यक्रमस्थळी २४x७ निगराणी ठेवण्याचं नियोजन केलं आहे.
नवरात्रोत्सव 2025 कधी सुरू होतो?
22 सप्टेंबर 2025 रोजी घटस्थापनेच्या मुहूर्ताने नवरात्र सुरु होत आहे. नऊ दिवस चालणाऱ्या या उत्सवात देशभरात गरबा, दांडिया, देवीची आराधना, जागरण, महाप्रसाद यासारख्या धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं.
विहिंपच्या भूमिकेवर प्रतिक्रिया
समर्थकांचं म्हणणं: धार्मिक कार्यक्रमांमध्ये धर्मपरिवर्तनाची शक्यता रोखण्यासाठी अशा अटी आवश्यक आहेत.
विरोधकांचं मत: हे धार्मिक विभाजनाला खतपाणी घालणारे निर्णय असून, समाजात दरी निर्माण करू शकतात.



